Advertisement

अर्थसंकल्प सादर झाला पण नोकर भरतीचं काय?

प्रजापत्र | Friday, 28/06/2024
बातमी शेअर करा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अर्थसंकल्पावरुन सरकारला धारेवर धरलं आहे. अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि जयंत पाटील यांनी संयुक्तपणे पत्रकारांशी संवाद साधला. नाना पटोलांनी यावेळी नोकर भरतीचा प्रश्न उपस्थित केला आहे.

 

 

नाना पटोले म्हणाले की, महायुती सरकारने मांडलेला अर्थसंकल्प हा केवळ घोषणांचा पाऊस आहे. राज्यात अजून १२ ते १३ जिल्ह्यांमध्ये पाऊस पडलेला नाही, त्यामुळे दुबारपेरणी करावी लागत आहे. सरकारने ज्या काही घोषणा केल्या त्याच्यामध्ये काँग्रेसने ज्या पाच गॅरंटी दिल्या होत्या त्याचा अंश दिसून येतोय.

''महिलांना दर महिन्याला साडेआठ हजार रुपये देण्याची गॅरंटी काँग्रेसने दिली होती. पण या सरकारने दीड हजार रुपये देऊन साठ टक्के कमिशनचं खाल्लं आहे. महागाईच्या काळात दीड हजार रुपये म्हणजे फसवण्याचं काम सरकार करत आहे.'' अशी टीका पटोलेंनी केली.

ते पुढे म्हणाले की, काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ केलं होतं.. परंतु या सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत. नोकऱ्यांचा भरतीचा उल्लेख कुठेही केलेला नाही. राज्यामध्ये बेरोजगारी वाढलेली असताना आणि पोलिस भरतीमध्ये गैरव्यवहार झालेला असताना नोकर भरतीबद्दल न बोलणं चुकीचं आहे.

 

 

''पोकळ आणि निवडणुकीच्या जुमल्याचा अर्थसंकल्प आहे. याचं पोस्टमार्टम आम्ही सोमवारपासून सुरु करणार आहोत. अर्थमंत्र्यांनी विभागनिहाय तरतुदी सांगितलेल्या नाहीत. महाराष्ट्रातल्या इतिहासातलं हे असं पहिलंच बजेट असेल.महाराष्ट्रातल्या जनतेची दिशाभूल करणारा हा अर्थसंकल्प असून शेतकऱ्यांच्या विद्युत बिलामध्ये मोठा गोंधळ पहायला मिळणार आहे. '' असं नाना पटोले म्हणाले.

Advertisement

Advertisement