Advertisement

 कुंडलिक खांडेविरोधात गुन्हा दाखल

प्रजापत्र | Friday, 28/06/2024
बातमी शेअर करा

बीड : बीड लोकसभा निवडणुकीतील उमेदवार बजरंग सोनवणे यांना आपण कशाप्रकारे मदत केली असा संवाद असलेली ऑडिओ क्लिप काल बीड जिल्हात व्हायरल झाली आणि त्याचा परिणाम धनंजय मुंडे यांचे समर्थक वाल्मिक कराड यांनी परळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली त्यावरून बीड जिल्हा शिवसेना प्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर परळीत गुन्हा दाखल झाला आहे. 

 

 

बीड कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी शिवसेना बीड जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय मुंडे यांचे सहकारी वाल्मिक कराड यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. कुंडलिक खांडे यांच्यावर कथित क्लिप ऑडिओ प्रकरणी परळी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शिवसेना बीड जिल्हा प्रमुख खांडे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पंकजा मुंडे समर्थक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. कुंडलिक खांडे यांच्या ऑफिसची तोडफोडही करण्यात आली होती. बीड शहरातील जालना रोडवरील खांडेंच्या ऑफिसवर हल्ला करण्यात आला होता. 

 

 

काय आहे व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये?
कुंडलिक खांडे यांच्यासोबत एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची चर्चा चालू असताना निवडणुकीपूर्वीच बजरंग सोनवणे यांना त्यांनी कशी मदत करायची हे सांगतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओतून दोघांमधील संवाद ऐकायला मिळत आहे. तर, दुसरी ऑडिओ क्लिप ही मतमोजणीनंतरची आहे, ज्यामध्ये म्हाळस जवळा या कुंडलिक खांडेंच्या मूळ गावातून पंकजा मुंडेंना मुद्दामून लीड दिली. कारण, ओबीसी मताचा आपल्याला फायदा होऊ शकतो हे सांगत असताना बीड विधानसभा मतदारसंघातील सगळ्या बुथवर कशाप्रकारे बजरंग सोनवणे यांच्यासाठी त्यांनी फिल्डिंग लावल्याचं ते सांगत आहेत. त्यामध्ये, धनंजय मुंडे आणि त्यांचे सहकारी वाल्मिक कराड त्यांच्याबाबतीत बोलत त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याचंही बोलत आहेत.

 

 

प्रकरण काय? 
बीडचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे आणि राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे शिवराज बांगर यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणेंना मदत केल्याची कबुली  कुंडलिक खांडे देत आहेत. तसेच या कथित ऑडिओ क्लिपमध्ये राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला करण्याची भाषा करत आहेत. निवडणूक निकालापूर्वी झालेल्या या कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप आता व्हायरल झालीय. त्यामुळे याची बीडच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरु आहेत. 

Advertisement

Advertisement