मुंबई : मध्य प्रदेशातील 'लाडली बहन' योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात 'लाडकी बहिण' योजनेची घोषणा सरकारनं केली आहे. या योजनेंतर्गत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांच्या बँक खात्यात थेट पैसे ट्रान्सफर केले जातात.
याच योजनेच्या धर्तीवर राज्यात योजना लागू होणार आहे. पण केवळ लाडकी बहिण योजनाच नको तर लाडका भाऊ योजना देखील आणा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली.
ठाकरे म्हणाले, लाडकी बहिण योजना तुम्ही आणत असाल तर मी त्याचं स्वागत करतो. पण लाडका भाऊ अशी योजना पण आणा. जसं माझ्या माता-भगिनींना तुम्ही लाभ देता तसंच माझ्या भावांना देखील तुम्ही लाभ मिळवून द्या. आता तो जुना काळ गेला, आता महिला देखील कर्तुत्ववान आणि सक्षम झालेल्या आहेत. जसं घराचा कर्ता पुरुष असतो तशाच आता महिला देखील घराच्या कर्त्या झालेल्या आहेत. त्यामुळं महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव न करता या योजना दोघांसाठी तुम्ही आणा.
दरम्यान, आत्तापर्यंत मुलींच्या मोफत शिक्षणाबाबत सरकारनं जे आश्वासनं दिलं होतं चंद्रकांतदादांनी ते आज मला चॉकलेट देऊन गेले होते. तसंच योजनांची चॉकलेटं तुम्ही देऊ नका, कारण लोकांची सहनशक्ती आता संपलेली आहे. लोकसभेच्या निवडणुकीमुळं आता त्यांना याची गोडी राहिलेली नाही.