Advertisement

बीड: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले होते. या निवडणुकीत अनेकांनी पंकजा मुंडे यांना जाहीर विरोध केला होता, मात्र आता महायुतीतल्याच काहींनी सोबत राहून विश्वासघात केल्याचे समोर आले आहे. महायुतीतील एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याची एक कथीत ऑडीओ क्लीप सध्या व्हायरल होत असून यात पंकजा मुंडे यांची राजकीय 'कुंडली' बिघडविण्यासाठी कशी रातोरात यंत्रणा आपण विरोधी उमेदवाराकडे वळविली हे सांगताना महायुतीचा एक पदाधिकारी ऐकायला मिळत आहे. 
बीडची लोकसभा निवडणूक यावेळी राज्यात गाजली. भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांच्यात झालेल्या लढतीमध्ये पंकजा मुंडेंचा निसटता पराभव झाला होता. निवडणूक दरम्यान अनेकांनी पंकजा मुंडेंना जाहिर विरोध केला, मात्र काहींनी सोबत फिरुन विश्वासघात केल्याचे आता समोर येत आहे. 
महायुतीतल्या एका पक्षाच्या काही गुन्हयात अडकलेल्या एका पदाधिकाऱ्याच्या कथीत ऑडीओ क्लीप सध्या व्हायरल होत आहेत. यात सदरचा पदाधिकारी 'आपण फक्त आपल्या गावात पंकजा मुंडेंना लीड दिली, विधानसभेला ओबीसी मते मिळविण्यासाठी मला ते आवश्यक होते, पण आपण बप्पाचेच काम केले आहे. सगळी यंत्रणा त्यांना दिली आणि पैसेही पुरवले' असे सांगताना ऐकायला मिळत आहे. विशेष म्हणजे यात सदरचा पदाधिकारी आपण विश्वासघात केल्याचे कबुल करत आहे. तर दुसऱ्या ऑडीओ क्लीपमध्ये तो पदाधिकारी पक्षांतर करण्याची तयारी करताना देखील ऐकायला मिळत आहे. ' आपण आपल्या कार्यालयात लगेच शरद पवारांचा फोटो लाऊ, मी इथे नेहमी जनता दरबार भरवतो, मी थेट अंगावर जाऊ शकतो' असे दावे सदर पदाधिकारी करित असल्याचे ऐकायला मिळत आहे. 
दरम्यान स्वत:च्या राजकीय 'कुंडली'त कधीच विश्वासार्हता न ठेवता आपल्याच लोकांच्या राजकारणाच्या 'खांडो'ळया करण्याचा प्रयत्न करत असलेल्या सदर पदाधिकाऱ्याबद्दल मुंडे समर्थक समाजमाध्यमांमधून रोश व्यक्त करीत आहेत. 
 

 

धनंजय मुंडे यांची गाडी फोडण्याचा कट? 
सदर ऑडीओ क्लीप मध्ये कथीत पदाधिकारी चक्क मंत्री धनंजय मुंडे यांची गाडी फोडण्याचा कट करित असल्याचे ऐकायला मिळत आहे. सदर ऑडीओ क्लीप मतदानाच्या अगोदरची असावी असा अंदाज असून धनंजय मुंडेंच्या गाडीवर दगड पडले तर आपले मतदान वाढेल असे सदर पदाधिकारी सांगताना ऐकायला मिळत आहे. 
 

Advertisement

Advertisement