Advertisement

उस्मान शेख एलसीबीचे नवे प्रमुख

प्रजापत्र | Wednesday, 26/06/2024
बातमी शेअर करा

बीड दि.२२(प्रतिनिधी):बीड जिल्हा पोलीस दलातील एलसीबी अर्थात स्थानिक गुन्हे शाखेचे वादग्रस्त पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांची अखेर उचलबांगडी झाली आहे. त्यांच्या जागेवर परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांना नियुक्ती देण्यात आली आहे. 
 

 

  पोलीस दलात एलसीबी अर्थात स्थानिक गुन्हे शाखा ही महत्वाची मानली जाते.बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे हे या पदावर नियुक्तीपासून वादग्रस्त ठरले होते.अख्खी एलसीबी घेऊन पुढाऱ्यांना घरी जाऊन शुभेच्छा देणे असेल किंवा एलसीबीमधील पोलीस कर्मचारी थेट एसीबीमध्ये अडकणे असेल,बीडची एलसीबी प्रत्येकवेळी वादग्रस्त ठरली.मात्र इतके सारे झाल्यानंतरही पोलीस अधीक्षकांनी मात्र संतोष साबळे यांची जोरदार पाठराखण केली होती, अगदी निवडणूक आयोगाकडे तक्रारी झाल्यानंतर देखील 'एलसीबी प्रमुख म्हणून ते पुढाऱ्यांच्या घरी गेले असतील, तो फोटो निवडणूक आचारसंहितेच्या काळातला नाही' असले उत्तर देऊन निवडणूक आयोगाची समजूत काढण्यात आली होती.
मात्र बीड जिल्ह्यात मराठा आंदोलनादरम्यान झालेला हिंसाचार, त्यातील आरोपींना अटक करण्यात कमी पडलेली एलसीबी असेल किंवा जिल्ह्यातील चोऱ्या, घरफोड्यांवर नियंत्रण मिळविण्यात एलसीबीला आलेले अपयश, मागच्या काही वर्षात प्रथमच एसीबीच्या रडारवर एलसीबी येण्याची घटना असेल,यामुळे संतोष साबळे यांच्या कारकिर्दीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.त्याला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
बुधवारी अखेर बीडच्या पोलीस अधीक्षकांनी एलसीबीमध्ये फेरबदल केले असून संतोष साबळे यांची एलसीबीमधून उचलबांगडी करण्यात आली आहे. आता एलसीबीची धुरा परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्याकडे देण्यात आली असून त्यांनी या पदाची सूत्रे स्वीकारली आहेत.

Advertisement

Advertisement