Advertisement

धारदार शस्त्रांचा धाक दाखवून महिलांच्या गळ्यातील दागिने लांबविले

प्रजापत्र | Saturday, 22/06/2024
बातमी शेअर करा

केज -  तालुक्यातील साळेगाव येथे मध्यरात्री दोन ठिकाणी घरफोडी झाली असून शस्त्राचा धाक दाखवून घरात झोपलेल्या आई व मुलीच्या गळ्यातील दागिने व नगदी रोख ४ हजार रु. ची चोरी करण्यात आली तर अन्य एकाचे घर फोडले आहे.

 

 

दि. २२ जून रोजी रात्री २:३० वा. च्या सुमारास रत्नमाला काशिनाथ राऊत व त्यांची बाळंत झालेली मुलगी सौ. दिपाली जगदेव व तिचे बाळ झोपलेले असताना घराचा दरवाजा धक्का मारून उघडला. त्यावेळी घरात रत्नमाला काशिनाथ राऊत आणि त्यांची मुलगी दिपाली जगदेव व तिचे बाळ झोपलेले होते. चोरट्यांनी घरात प्रवेश केल्या नंतर रत्नमाला राऊत आणि दिपाली जगदेव यांना धारदार शस्त्राचा धाक दाखविला. तसेच रत्नमाला राऊत हिच्यावर शस्त्राचा वार केला. यात रत्नमाला राऊत ही जखमी झाली असून त्यांच्या डाव्या हाताच्या पोटरीवर पाच टाके पडले आहेत. तर त्यांची मुलगी   दिपाली जगदेव हिला खरचटले आहे. चोरट्यांनी दोघींच्या गळ्यातील सोन्याचे दागिने व पर्स मधील नगदी चार हजार रु. व एक मोबाईल चोरून नेला. तसेच घरा जवळच्या शेतात पर्स टाकून पळून गेले. चोरी करीत असताना चोरट्यांनी शेजारी राहत असलेले अनिरुद्ध बचुटे यांच्या घराला बाहेरून कडी लावली.

 

 

याच दरम्यान चोरट्यांनी मन्मथ मेडकर यांच्या घराचा दरवाजाचा कोंडा कापून आत प्रवेश केला आणि घरातील कपाट, कपडे व धान्याचे पोते व स्वयंपाक घरात धुंडाळा घेतला. मन्मथ मेडकर यांच्या घरातील कपाटात ठेवलेले नगदी दहा हजार रु चोरून नेले. दरम्यान यावेळी मन्मथ मेडकर आणि त्यांची पत्नी हे पुणे येथे मुला कडे गेले असल्याने त्यांच्या घरी कोणी नव्हते. चोरीची माहिती मिळताच पोलिसांच्या रात्रगस्ती पथकावरील पोलीस उपनिरीक्षक कादरी, पोलीस जमादार श्रीकांत चौधरी, पोलीस नाईक प्रकाश मुंडे यांनी घटनास्थळी भेट दिली.तसेच पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली चोरीचा तपास करण्यासाठी पोलीस जमादार बाबासाहेब बांगर आणि पोलीस नाईक शिवाजी कागदे यांनीही घटनास्थळाला भेट दिली. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Advertisement

Advertisement