बीड - 'आमचा जीव गेला तरी चालेल, आम्ही तुमच्या सोबत राहू', असा शब्द बीड जिल्ह्यातील हातोला येथील ओबीसी बांधवांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना दिला आहे. आज सकाळपासून हातोला येथे ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी हातोला येथे ओबीसी समाजाच्या बांधवांकडून आंदोलन सुरु होते. या आंदोलनाची माहिती मिळताच छगन भुजबळांनी आंदोलनकर्त्यांशी फोनवरून संपर्क साधला. भुजबळांच्या फोननंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे.
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील हातोला येथील राज्यमार्ग बीड, नगर, धामणगाव, हातोला येथे शेकडो महिला भगिनींनी रस्त्यावर उतरून ओबीसी संरक्षण बचावासाठी रस्ता रोको आंदोलन सुरू केले होते. एक ओबीसी कोटी ओबीसी, ओबीसी एकजूटीचा विजय असो, अशा घोषणा देत चक्क महिलांनीच राज्य महामार्ग आडवून रस्ता रोको आंदोलन सुरू केले. याबाबत छगन भुजबळ यांना माहिती मिळताच त्यांनी आंदोलकांशी संपर्क साधला.
भुजबळांच्या फोननंतर आंदोलन मागे
छगन भुजबळ फोनवरून आंदोलनकर्त्यांना म्हणाले की, आपण कोर्टात जाणार आहोत. रास्ता रोको आंदोलन मागे घ्या. आज सरकारसोबत बैठक आहे. यात सरकार काय निर्णय घेतेय ते बघू, असे आवाहन त्यांनी यावेळी केली. भुजबळांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती करताच आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. तसेच आमचा जीव गेला तरी चालेल, आम्ही सदैव तुमच्या पाठीशी उभे राहू, असा शब्द आंदोलकांनी छगन भुजबळांना दिला.
ओबीसी आंदोलकांच्या शिष्टमंडळाची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
दरम्यान, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको या मागणीसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे नऊ दिवसापासून उपोषण सुरु आहे. आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने उपोषणकर्त्यांची भेट घेत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे उपोषणावर ठाम आहेत. यावेळी गिरीश महाजन यांनी हाके आणि वाघमारे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा करून दिली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष्मण हाके यांच्या मागण्यासंदर्भात आज संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचे आयोजन केले आहे.