सरकारच्या शिष्टमंडळानं ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांची वडीगोद्री येथे उपोषणस्थळी भेट घेतली आहे. या शिष्टमंडळात मंत्री गिरीश महाजन,मंत्री उदय सामंत, मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह आमदार गोपीचंद पडळकर यांचा समावेश असून प्रशासनाकडून जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण नाथ पांचाळ, उपविभागीय अधिकारी दीपक पाटील, तहसीलदार चंद्रकांत शेळके होते.
मुंबईला चर्चेसाठी येण्याचे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केले. यावेळी गिरीश महाजन यांनी हाके यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी फोन वर बोलणे करून दिले. यादरम्यान हाके बोलताना म्हणाले, मी आजपर्यंत माझ्या मागण्या मांडत आलो आहे. कसा धक्का लागत नाही हे सरकारने सांगावे, निवडणुकांच्या माध्यमातून दहशत निर्माण केली जात आहे, हे महाराष्ट्रने पहिल्यांदा पाहिले आहे. आमच्या प्रश्नाचे उत्तर नाही मिळाले, तर हे उपोषण सुरुच राहणार आहे.आमचे शिष्टमंडळ चर्चेसाठी येईल, असेही हाके म्हणाले. सरकार आपल्या पाठिशी उभा आहे. कुठेही ओबीसी समाजाला धक्का लागत नाही. मुख्यमंत्री व उमुख्यमंत्री यांच्या सोबत मागण्यांबाबत चर्चा करू. तुम्ही तुमचं दहा- पाच जणांचं शिष्टमंडळ मुंबईला पाठवा. त्यांची नावं द्या. आम्ही चर्चा करून प्रश्न सुटेल, असे गिरीश महाजन यांनी सांगितले आहे.
'आम्ही लेखी घेतल्याशिवाय उपोषण सोडणार नाही'
आमचे जीव गेले तरी चालेल. तुम्ही सगळ्या लेकरांना सारखं धरावं, आमच्या २९ टक्क्याला कुठेही धक्का लागणार नाही, हे लिहून द्यावं. मागच्या दाराने निघालेले ५७ लाख प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे, अशी मागणी नवनाथ वाघमारे यांनी महाजनांकडे केली.
हाकेंच्या शिष्टमंडळात कोण आहे?
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री धनंजय मुंडे, भाजपा नेते पंकजा मुंडे, आमदार गोपीचंद पडळकर, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, महादेव जानकरांसह वडीगोद्री येथील स्थानिकचे बळीराम खटके, दीपक बोराडे, रवींद्र खरात, विजय खटके, व डॉ. अभय जाधव हे शिष्टमंडळ जाणार आहे.