Advertisement

साखरपुड्यानंतर तिसऱ्याच दिवशी तरूणीने घेतला गळफास

प्रजापत्र | Thursday, 20/06/2024
बातमी शेअर करा

बीड - (प्रतिनिधी) साखरपुडा झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी तरूणीने राहत्या घरातील लोखंडी आडूला गळफास घेवून आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना काल जातेगाव (ता. गेवराई) येथे घडली. साखरपुडा झाल्यापासून होणाऱ्या पतीसह सासू- सासरे वारंवार फोन करून संबंधीत तरूणीला तुझ्या आई वडिलांकडून व्यवसायासाठी तीन लाख रूपये घेवून दे अशी मागणी करत लग्न तोडण्याची आणि बदनामीची धमकी देत होते. या धमकीला आणि त्रासाला कंटाळून सदर तरूणीने आत्महत्या केली. या प्रकरणी होणाऱ्या पतीसह सासू-सासऱ्याविरूध्द तलवाडा पोलीस ठाण्यात कलम ३०६, ५०६, ३४ भांदवीप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. 

 

गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाणे हद्दीतील जातेगाव येथील भूमिका देविदास कारके (वय २०) हिचा गेवराई येथील पृथ्वीराज मोतीलाल सुतार याच्यासोबत दि. १६ जुन २०२४ रोजी जातेगाव येथील मुलीच्या राहत्या घरी साखरपुडा झाला होता. त्यानंतर दि.१९ जुन रोजी सकाळी भुमिका कारके हिने आपल्या आई वडिलांना होणाऱ्या सासरची मंडळी वारंवार फोन करून आई वडिलांकडून व्यवसायासाठी तीन लाख रूपये घेवून दे अशी मागणी करत असल्याचे सांगितले. त्यावेळी आई वडिलांनी आपण त्यांना समजावून सांगूत असेही सांगितले. त्यानंतर मात्र दि.१९ जुन रोजी सायं. ५ वाजण्याच्या सुमारास भुमिका देविदास कारके (वय २०) हिने राहत्या घरातील लोखंडी आडूला गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकरणी मयत तरूणीची आई सत्यभामा देविदास कारके यांच्या फिर्यादीवरून मयत तरूणीचा होणारा पती पृथ्वीराज मोतीलाल सुतार, सासरा मोतीलाल मनोहर सुतार, सासू मिराबाई मोतीलाल सुतार (सर्व रा. गेवराई) यांच्याविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 

 

Advertisement

Advertisement