बीड-शहरातील पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल (दि. १९) मध्यरात्री १२ च्या सुमारास सनी आठवले आणि डोंगरे नावाच्या व्यक्तिमध्ये जोरदार वाद होऊन गंभीर मारहाण झाल्याचा प्रकार समोर येतं आहे. या दोन गटातील वादात सात जण जखमी झाले आहेत. यातील तीन रुग्णांवर छत्रपती संभाजी नगरमधील घाटी रुग्णालयात उपचार सुरु असून चौघाना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पेठ बीड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांनी दिलेल्या माहितीनुसार सनी आठवले यांच्या दिपज्योत संघटनेच्या शाखेचे तेलगाव नाका परिसरात उदघाटन करण्यात आले होते. या शाखेचा बोर्ड ही त्याठिकाणी लावण्यात आला होता. मात्र काल रात्री डोंगरे नावाच्या व्यक्तीने सदर बोर्ड काढून टाकला. यानंतर सनी आठवले व त्याच्या सोबत आणखीन तिघे जण त्याठिकाणी गेल्यानंतर डोंगरे व त्याच्या मित्र परिवारातील चौघानी एकमेकांना बेदम मारहाण केली. यात सनी आठवलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
सध्या दोन्ही गटातील सात जणांवर उपचार सुरु असून पेठ बीड पोलीस ठाण्यात एकमेकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.