पाठ फिरविल्याने सर्वत्र शुकशुकाट
धीरज झाडे
बीड दि.11-संक्रांतीनिमित्त बाजारपेठा गजबजल्या आहेत. ठिकठिकाणी फेरीवाले, दुकाने, विविध वस्तू घेऊन विक्रीसाठी सज्ज झाले असतानाच ग्राहकांनी मात्र बाजाराकडे पाठ फिरविली असल्याचे दिसून येते. यामुळे सुभाष रोडवरील मुख्य बाजारपेठेत सोमवारी(दि.11) शुकशुकाट पहायला मिळाला. अवघ्या दोन दिवसावर आलेल्या मकरसंक्रांतीच्या सणावर मंदीचे सावट निर्माण झाले आहे.
इंग्रजी कॅलेंडरनुसार वर्षाचा पहिला सण म्हणून मकरसंक्रांतीचे विशेष महत्व आहे. भोगी आणि मकरसंक्रांती असे दोन महत्वाचे दिवस हा सण असतो. हिवाळ्यात बाजरीची भाकरी, तीळ-शेंगदाण्याची पोळी असे ऊर्जा देणारे पदार्थ आरोग्यदायी असतात. त्यामुळे सणाला भोगी दिवशी बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत, पालेभाजीचा गरगटा-वरणे-वांगे-मटार यांची मिश्र भाजी करून नैवेद्य दाखविण्यात येतो. ंतर मकरसंक्रांतीपासून पुढे रथसप्तमीपर्यंत घरोघरी हळदी कुंकूचे आयोजन केले जाते.त्यानिमित्ताने वाण म्हणून एखादी वस्तू दिली जाते. यासाठी बाजारपेठेत सध्या विविध आकर्षक वस्तू विक्रीसाठी आल्या आहेत. मात्र ग्राहकांनी बाजारपेठेकडे पूर्णपणे पाठ फिरविली असल्याचे दिसून येते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागच्या वर्षभरापासून बाजारपेठेत आलेली मंदी मकरसंक्रांतीतही कायम असल्याचे विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीवरून समजते. सध्या मकरसंक्रांतीला अवघे दोन दिवस बाकी आहेत. या निमित्त बाजारात वाण म्हणून विविध आकर्षक वस्तू कमी दरात विक्रीसाठी आल्या आहेत. तसेच तीळगुळाचे पॉकीट, रांगोळी, रांगोळीचे छाप, हलव्याचे दागिने आले असून ग्राहकांनी मात्र या सर्व गोष्टींकडे पाठ फिरविली असल्याचे व्यापार्यांच्या वतीने सांगण्यात येते. यंदा प्रथमच या मकरसंक्रांतीत ग्राहकांचा शुकशुकाट पहायला मिळाला.
पंधरा वर्षात पहिल्यांदाच भीषण मंदी
मी रांगोळी आणि छापचा व्यवसाय गेल्या पंधरा वर्षापासून करीत आहे. सुभाषरोड सह विविध गल्लोगल्ली जाऊन मकरसंक्रांतीच्या काळात माझा हजार ते दीड हजारांचा व्यवसाय रोज होत असे. यावर्षी मात्र कोरोनाचे ग्रहण लागले आहे. पूर्वी सुभाषरोडवर प्रती दिवसाला अडीच हजरांपेक्षा अधिक व्यवसाय माझा मकरसंक्रांतीच्या काळात होत असायचा. यंदा मात्र सर्वच चित्र पालटले आहे. पंधरा वर्षात मी पहिल्यांदाच एवढी भीषण मंदी पाहिली आहे. गेल्या आठवड्यापासून माझा चार हजारांचा व्यवसाय झाला असून मकरसंक्रांती निमित्त मी साठ हजारांच्या सामानाची खरेदी केली होती. मात्र ग्राहकाअभावी आता हे सामान धूळ खात पडते की काय? अशी भीती निर्माण झाली आहे.
-इब्राहीम आत्तार (रांगोळी आणि छाप विक्रेते)
मी नगरहून बीडला आलो मात्र...
मी आणि माझा मामा मकरसंक्रांतीच्या काळात तीळगुळ आणि रांगोळीचा व्यवसाय करतो.मकरसंक्रांतीच्या आठ दिवस आधी मी बीडला मामाकडे येतो. मागील दहा वर्षापासून मी मामासोबत हा व्यवसाय करत आहे. या काळात मोठ्या प्रमाणावर आर्थिक उत्पन्न आम्ही दोघे मिळून कमवायचो. यावर्षी पहिल्यांदाच ग्राहकांचा शुकशुकाट पहायला मिळत आहे. पूर्वी मला ग्राहकांना बोलायलाही वेळ मिळत नसे. आता मात्र दिवसभरात केवळ पंधरा ते वीस ग्राहकच खरेदीसाठी येत आहेत. मी नगरहून बीडला मोठ्या आशेने व्यवसायासाठी येत असायचो. आता मात्र इथला प्रतिसाद पाहून पुढील वर्षीपासून मी नगरमध्येच नवीन व्यवसाय करण्याचा निश्चय केला आहे.
-शाहरूख आत्तार (तीळगुळ, हळदी-कुंकू विक्रेते)
हेही वाचा