मुंबई - शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत महाराष्ट्रात खरीप हंगाम - २०२४ साठी पीक विमा भरण्याची सुरुवात आजपासून (१८ जून) शासनाच्या https://www.pmfby.gov.in या पोर्टलद्वारे करण्यात आली आहे. यावर्षी शेतकऱ्यांना आपल्या अधिसूचित पिकांचा विमा भरण्यासाठी केवळ १ रुपया भरावा लागणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज दिली. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मागील वर्षी विक्रमी १ कोटी ७० लक्ष पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आपला पीकविमा भरून या योजनेत सहभाग घेतला होता. दरम्यान, पीक विमा भरण्याची अंतिम मुदत ही १५ जुलै असणार आहे.
पीक विमा योजनेत 'या' १४ पिकांचा समावेश
खरीप २०२४ साठी भात, ज्वारी, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी, नाचणी, भुईमूग, तीळ, कारळे, कांदा ही १४ पिके विमा योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत. तर या पिकांचा विमा भरण्याची अंतिम मुदत १५ जुलै असून, त्यापूर्वी शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा भरून घ्यावा, असे आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.