Advertisement

शेतकरी महिलेचा शॉक बसून मृत्यु 

प्रजापत्र | Tuesday, 18/06/2024
बातमी शेअर करा

बीड -दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळात गहूखेल येथील शेतातील विद्युत खांब खाली पडला. पण महावितरणने खांब तर तसाच ठेवला शिवाय विद्युत प्रवाह देखील बंद केला नाही. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे शेतात कामासाठी गेलेल्या ५० वर्षीय महिलेचा विद्युतवाहिनीला स्पर्श झाल्याने सोमवारी सायंकाळी मृत्यु झाला. हौसाबाई प्रल्हाद साखरे रा.गहुखेल असे मृत महिलेचे नाव आहे.

 

 

आष्टी तालुक्यातील गहूखेल येथील हौसाबाई प्रल्हाद साखरे (५०) या सोमवारी शेतात काम करत होत्या. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळाने शेतात पडलेल्या खांबावरील विद्युत पुरवठा महावितरणने बंद केला नव्हता. याची कसलीच कल्पना हौसाबाई यांना नव्हती. सोमवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे काम करताना खांबावरील विद्युत तारेला स्पर्श झाल्याने हौसाबाई यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती,दोन विवाहित मुली असा परिवार आहे.

 

 

महावितरणचा निष्काळजीपणा
सदरील महिलेच्या शेतातून महावितरणची लाईन गेलेली आहे. वादळात याच शेतात विद्युत खांब पडल्याने तारा शेतात पसरल्या होत्या.महावितरणने विद्युत प्रवाह बंद न केल्याने हालगर्जीपणा केल्याने हा मृत्यू झाल्याचे वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा महासचिव बाळासाहेब गायकवाड यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement