Advertisement

विधानसभा निवडणुकीसाठी मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला?

प्रजापत्र | Monday, 17/06/2024
बातमी शेअर करा

मुंबई- राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आता अवघे तीन-चार महिने शिल्लक राहिले आहेत. लोकसभा निवडणुकीत जागावाटप उशीरा झाल्याचा फटका अनेक उमेदवारांना बसला होता. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आतापासूनच विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची बोलणी सुरु केली आहेत. गेल्या आठवड्यात मुंबईत मविआची बैठक झाली. त्यामध्ये जागावाटपाची प्राथमिक बोलणी झाली. यानंतर मविआच्या विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आला आहे.

 

 

 विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या वाट्याला सर्वाधिक जागा येण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे १३ खासदार निवडून आले होते. आता विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष १०० ते १०५ जागांवर निवडणूक लढवू शकतो. तर लोकसभा निवडणुकीला ९ जागा जिंकणाऱ्या ठाकरे गटाच्या वाट्याला ९० ते ९५ जागा येऊ शकतात. लोकसभा निवडणुकीत ८० टक्क्यांचा सरस स्ट्राईक रेट असणारा शरद पवार गट विधानसभेला ८० ते ८५ जागांवर लढू शकतो, असा अंदाज आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटप अंतिम करण्यासाठी चर्चेच्या आणखी काही फेऱ्या होणार आहेत. सध्या मविआतील तिन्ही पक्षांनी आपापल्या नेमक्या ताकदीचा अंदाज लावण्यासाठी अंतर्गत यंत्रणा कामाला लावल्या आहेत. ही सगळी माहिती प्राप्त झाल्यानंतर तिन्ही पक्ष पुन्हा एकदा जागावाटपासाठी चर्चेला बसतील.

 

 

लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीने घवघवीत यश संपादन केले आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी ३० जागांवर मविआचे उमेदवार विजयी झाले. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात काँग्रेसला घरघर लागली होती. अनेक बड्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. तर पक्षात पडलेल्या फुटीमुळे ठाकरे गट आणि शरद पवार गटाचीही अवस्था तितकीशी चांगली नव्हती. भाजपच्या अजस्त्र यंत्रणेसमोर हे पक्ष कितपत टिकाव धरतील, याबाबत साशंकता होती. मात्र, मविआने ३० जागा जिंकत या सर्व शंका-कुशंका फेटाळून लावल्या. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकाला सामोरे जाताना मविआतील तिन्ही पक्षांचा आत्मविश्वास कैकपटीने वाढला आहे. 

 

 

ठाकरे गटाला मुंबईत जास्त जागा
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची ताकद कोणत्या भागात आहे यावरुन जागावाटप आणि मतदारसंघ ठरवले जातील. त्यानुसार विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काँग्रेस पक्षाला जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. तर मुंबईत ठाकरे गटाच्या वाट्याला जास्त जागा येऊ शकतात. शरद पवार गट पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात विधानसभेच्या जास्त जागांची मागणी करेल, असा अंदाज आहे.

Advertisement

Advertisement