Advertisement

  बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रकृती बिघडली

प्रजापत्र | Saturday, 15/06/2024
बातमी शेअर करा

  नवी दिल्ली- बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रकृती बिघडल्यानं रुग्णालयात दाखल झाले आहेत. नितीश कुमार मेदांता रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज सकाळी नितीश कुमार यांच्या हातामध्ये वेदना होत असल्यानं ते मेदांता रुग्णालयात दाखल झाले आहेत. या रुग्णालयाच्या ऑर्थोपेडिक विभागात नितीश कुमार यांची तपासणी करण्यात आली. नितीश कुमार सकाळी उठल्यानंतर त्यांच्या हातामध्ये वेदना जाणवत होत्या. यानंतर ते रुग्णालयात गेले.  

 

 

नितीश कुमार यांचे दैनंदिन कार्यक्रम गेल्या काही दिवसांपासून वाढले होते. नितीश कुमार यांनी निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी दौरे केले होते. निवडणुकीच्या निकालानंतर दिल्लीत एनडीए सरकार स्थापनेच्या निमित्तानं पक्षाच्या नेत्यांसोबत त्यांच्या बैठका सुरु होत्या. बिहारमधील कामांच्या बद्दल देखील त सक्रिय झाले होते.गेल्या दोन दिवसांमध्ये नितीश कुमार यांनी बैठका घेतल्या होत्या. अधिकाऱ्यांच्या सोबत बैठका घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी कॅबिनेट बैठक देखील बोलावली होती. या कारणामुळं नितीश कुमार यांना आराम करायला मिळाला नव्हता.  

 

 

 

निवडणुकीच्या काळात देखील प्रकृती बिघडलेली
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची लोकसभा निवडणुकीच्या काळात देखील त्यांची प्रकृती बिघडली होती. बिहारमधील भाजप नेते माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांच्या निधनाच्या वृत्तानंतर नितीश कुमार अस्वस्थ झाले होते. सुशीलकुमार मोदी यांच्या अंत्यसंस्काराला देखील ते जाऊ शकले नव्हते. नरेंद्र मोदी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यास देखील ते गेले नव्हते. तर, काही ठिकाणी निवडणुकीतील प्रचाराचे कार्यक्रम देखील नितीश कुमार यांनी रद्द केले होते. 

 

 

जदयू एनडीएमध्ये
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जदयू पक्ष आणि लालू प्रसाद यादव यांचा राजद यांची राज्यात सत्ता होती.मात्र, जानेवारीत नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला. या निर्णयासोबत नितीश कुमार इंडिया आघाडीतून बाहेर पडले. त्यानंतर ते पुन्हा एनडीएत सहभागी झाले.लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत न मिळाल्यानं मित्र पक्षांचं महत्त्व वाढलं आहे. जदयूनं एनडीएसोबत राहण्याचा निर्णय घेत नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला.

 

Advertisement

Advertisement