Advertisement

संपादकीय अग्रलेख- अजित पवारांचा मुखभंग

प्रजापत्र | Saturday, 15/06/2024
बातमी शेअर करा

लोकसभा निवडणुकीत महायुतीला सपाटून  मार खावा लागल्यानंतरही महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत हीच महायुती कायम असेल आणि पराभवाची जबाबदारी सर्वांची आहे असे स्वतः देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगत असले तरी या दोघांची विधाने किती पोकळ आहेत हे संघ परिवाराने स्पष्ट केले आहे. संघाच्या मुखपत्रात महाराष्ट्रातील पराभवाचे खापर अजित पवारांना जवळ करण्यावर म्हणून जे फोडले गेले त्यातूनच अजित पवारांबद्दल संघ परिवाराला किती पुळका आहे आणि भाजपने त्यांच्याशी कसे वागावे हे सांगणारा हा लेख होता. त्यामुळे अजित पवार जाहीरपणे काहीही बोलत असले तरी संघाने त्यांचा मुखभंग केला आहे हे नक्की.

 

 

महाराष्ट्राच्या राजकारणाला मागच्या काही काळात जे राजकीय गटाराचे स्वरूप आले त्याची जबाबदारी अर्थातच भाजपची आहे. भाजपने मागच्या काही काळात लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ज्या पद्धतीने ठिकठिकाणी तोडफोड केली ती सामान्यांना रूचणारी नव्हती. त्यातही महाराष्ट्रात ज्या अजित पवारांवर भाजपवाले अनेक वर्षांपासून सातत्याने टीका करतात त्या अजित पवारांना भाजपने नुसते जवळच केले नाही तर राज्याच्या सत्तेत भागीदारी दिली. त्यांना उपमुख्यमंत्री केले. हे होण्याच्या चार दिवस अगोदर देशाच्या पंतप्रधानांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडले होते. त्यामुळे नंतरच्या काळात जी पक्षाची भूमिका बदलली ती भाजपच्या कट्टर कार्यकर्त्यांना देखील पचविणे जड गेले होते. अर्थात भाजपमध्ये लोकसभा निवडणुकीच्या अगोदर नेतृत्वाला विरोध करण्याची क्षमता जिथे दस्तूरखुद्द देवेंद्र फडणवीसांमध्ये नव्हती तिथे सामान्य कार्यकर्ता त्यांना विरोध काय करणार. परंतू याच सामान्य कार्यकर्त्यांनी आणि जनतेने लोकसभा निवडणुकीत भाजपला धडा शिकविला. हे वक्तव्य काही कोणत्या विरोधी पक्षाचे नाही तर भाजपला ‘बौद्धिक’ शिकविणार्‍या आणि भाजपची मातृसंस्था असलेल्या संघ परिवारातून आता हा विचार समोर येत आहे. संघाच्या मुखपत्रात सरळ सरळ अजित पवारांना सोबत घेण्यावर टीका करण्यात आली आणि पराभवाचे खापर त्यांच्यावर फोडण्यात आले. संघ परिवाराची स्वतःची एक कार्यपद्धती आहे. संघ परिवाराला ज्यावेळी सरकारला किंबहूना भाजपला काही सुचना द्यायच्या असतात आणि त्यावर चर्चाही अपेक्षीत असते त्यावेळी संघ परिवारातून मुखपत्राद्वारे किंवा जाहीर कार्यक्रमांमधून अशी वक्तव्ये केली जात असतात. इतरवेळी संघाची निर्णय प्रक्रिया फार मोजक्या लोकांमध्ये होत असते. अनेक बैठकांना तर अगदी वरिष्ठ नेत्यांनाही ‘तुम्ही येथे अपेक्षीत नाही’ असे सांगताना संघ परिवारातील स्वयंसेवक कचरत नाहीत. अशा परिस्थितीत ज्यावेळी संघाचे मुखपत्र जाहीरपणे अजित पवारांवर पराभवाचे खापर फोडते त्यावेळी त्यांना या विषयावर व्यापक चर्चा अपेक्षीत आहे असाच त्याचा अर्थ असतो. संघ परिवाराला एकाच वेळी भाजपला आणि अजित पवारांना देखील उघडे पाडायचे आहे हाच या संपूर्ण लेखनप्रपंचाचा हेतू आहे असे सांगायला मोठा वाव आहे.

 

 

मुळातच अजित पवार आणि भाजप हे रसायण भल्या भल्यांना पटणारे नव्हते. त्यातच संघाच्या ‘संस्कारात’ हे बसणारे नव्हते पण लोकसभा निवडणुकीच्या अगोदर असले काही बोलण्याचे धारिष्टय ना संघाने दाखविले ना भाजपने त्याची फिकीर केली असती आता मात्र परिस्थिती वेगळी आहे. तोडाफोडीचे राजकारण करून देखील भाजपला स्वतःच्या बळावर बहूमत मिळविता आले नाही त्यामुळे आता ‘संस्कारांपासून दूर झाल्यानेच’ हे सारे घडल्याचे सांगायला संघ परिवार मोकळा आहे आणि त्यासाठी त्यांनी अजित पवारांचे उदाहरण पुढे केले आहे. त्यामुळे आता पुढच्या काळातही भाजपच्या नेतृत्वाला अजित पवारांसाठी फार मोकळा हात सोडता येईल असे म्हणण्यासारखी परिस्थिती राज्यात नाही. खर्‍या अर्थाने लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर संघ परिवाराने पुन्हा एकदा अजित पवारांचा मुखभंग केला आहे.

Advertisement

Advertisement