पुणे- कोकणात, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात आज शुक्रवारी (दि.१४) तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तसेच पूर्व विदर्भ वगळता राज्यातील उर्वरित सर्व जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. तर १५ व १६ जून रोजी मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व कोकणातील जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे तिथे यलो अलर्ट आहे. दरम्यान, पुण्यात उन्ह-पावसाचा खेळ पहायला मिळत आहे.
येत्या १७ व १८ जून रोजी कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा भागातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने यलो अलर्ट दिला आहे. सध्या माॅन्सूनची वाटचाल अतिशय मंदावलेली आहे. तर बंगालच्या उपसागरावरून मॉन्सूनचे जे प्रवाह येत आहेत, त्यांच्यामध्ये ऊर्जा नाही. त्यामुळे मॉन्सूनचा जोरदार पाऊस होत नाही. पुढील ४ ते ५ दिवसांमध्ये माॅन्सून देशाच्या आणखी काही भागात दाखल होणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
राज्यात माॅन्सून जळगाव, अमरावती आणि चंद्रपूरपर्यंत पोचलेला आहे. माॅन्सूनने बुधवारी राज्यातील काही भागात प्रगती केली होती. पण दोन दिवसांमध्ये माॅन्सूनचा मुक्काम एकाच जागेवर आहे. तो पुढे सरकलेला नाही. परंतु, दोन दिवसांत त्याला पुढे जाण्यासाठी पोषक वातावरण असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
माॅन्सूनने मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र व्यापलेले आहे. सध्या माॅन्सूनची सीमा ही नवसारी, जळगाव, अमरावती, चंद्रपूर, बिजापूर, मलकानगरी आणि विजयानगरम या भागातच आहे. पुढील ४ ते ५ दिवसांमध्ये माॅन्सून ओडिशा, महाराष्ट्र, छत्तीसगड, किनारी आंध्र प्रदेश आणि बंगालच्या उपसागरात प्रगती करेल, असा अंदाज देण्यात आला आहे.