राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अखेर अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. या पोटनिवडणुकीत आमच्याकडून सुनेत्रा पवार या उमेदवार असतील, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. या जागेसाठी मी इच्छुक होतो, मात्र पक्षात सर्वानुमते सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाल्याचं भुजबळ यांनी सांगितलं.
सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याने छगन भुजबळ नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होती. मात्र ही चर्चा भुजबळांनी फेटाळून लावली आहे. तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर नाराजी दिसत आहे का? सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नाहीत, असं ते म्हणाले.
राज्यसभा पोटनिवडणुकीबाबत बोलताना छगन भुजबळ यांनी म्हटलं की, "या जागेसाठी माझ्यासह आनंद परांजपे हेदेखील इच्छुक होते. मात्र आमच्या पक्षातील कोअर कमिटीच्या आम्ही सर्व सदस्यांनी मिळून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याविषयी निर्णय घेतला. यामध्ये अजितदादांचा काहीही संबंध नाही. एक जागा असल्यामुळे इच्छुक असलेल्या सर्वांनाच उमेदवारी देणं शक्य नव्हतं," अशा शब्दांत भुजबळ यांनी आपली भूमिका मांडली आहे.दरम्यान, "राज्यात महायुतीचे आमदार मोठ्या प्रमाणात असल्याने आमची ही जागा सहज निवडून येईल. त्यामुळे महाविकास आघाडी उमेदवार देणार नाही, असं मला वाटतं," असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे.