सोलापूर- ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके हे अंतरवली सराटी येथे उपोषण करण्यास जात होते. ही माहिती पेालिसांना मिळाल्यानंतर हाके यांच्या लोकेशनची माहिती घेऊन त्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. दरम्यान, रात्रीतच हाके यांना बार्शी पोलिसांनी ताब्यात घेतले.
गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटी येथे उपोषणास बसले आहेत. या उपोषणामुळे राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. त्यातच ज्याठिकाणी जरांगे-पाटील उपोषणास बसले आहेत, त्याच गावात ओबीसी आरक्षण टिकविण्याच्या मागणीसाठी प्रा. लक्ष्मण हाके हे उपोषण करणार होते. तशी त्यांनी घोषणाही केली होती. अंतरवली येथे स्थानिक ओबीसी समाज बांधवांनी हाके यांना पाठिंबा दर्शविला होता.
त्यानुसार त्यांनी उपोषणास बसण्याची तयारी सुरू केली होती. हाके हे माढा लोकसभा निवडणूकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. यापूर्वी ओबीसी समाजाच्या एल्गार मेळाव्यात त्यांनी अतिशय प्रखरपणे आपली भूमिका मांडली होती. आता अंतरवली सराटी मराठा आणि ओबीसी असा वाद निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी सावधानतेची भूमिका घेतली आणि हाके यांना ताब्यात घेऊन उपोषण न करण्याबाबत आवाहन केले आहे.