दुष्काळांच्या झळांनी होरपळणाऱ्या मराठवाड्याला मान्सूनच्या सरींनी मोठा दिलासा दिलाय. मराठवाड्यातील बीड, लातूर, परभणी,धाराशिव आणि जालना या ५ जिल्ह्यांमध्ये मागच्या दोन दिवसांपासून मान्सूनच्या जोरदार सरी बरसत आहेत. त्यामुळे कुठे नदीला पाणी आले, कुठे प्रकल्पाचाही पाणीसाठा वाढलाय. पूर्ण उन्हाळा दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या या मराठवाड्यातील जिल्ह्यांना पावसाने दोन दिवसातच पाणीदार केले आहे.
परभणीत दोन दिवसात जवळपास ३८ मिमी पाऊस झालाय त्यात केकरजवळा मंडळात अतिवृष्टी झालीय. जोरदार पाऊस झाल्याने कोरडी पडलेल्या गोदावरीला पाणी आले आहे तर तिकडे लोअर दुधना प्रकल्पात ४% नी पाणी साठा वाढलाय महत्त्वाचे म्हणजे काल वीज पडून २ जनांसह एका बैलाचा मृत्यू झालाय. तिकडे बीड जिल्ह्यातही अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच जुन मध्ये जोरदार पाऊस झालाय ४ महसूल मंडळात अतिवृष्टी झालीय. अनेक छोटया मोठ्या नदी नाल्यांना पाणी आले आहे. जालन्यातही पावसाचे धुमशान सुरुय मागच्या २४ तासात ७ महसूल मंडळात अतिवृष्टी झालीय. सुरू असलेल्या दमदार पावसाने बळीराजा सुखवलाय. लातूरमध्ये तर पावसाने अक्षरशा धुमाकूळ घातलाय मागच्या २४ तासात ६३. ६० मिलिमीटर पावसाची नोंद लातूरमध्ये झाली आहे.
लातूरमधील आठवडी बाजाराच्या मैदानात पाणी साचल्यामुळे आठवडी बाजार रस्त्यावर भरलाय तर लातूर उदगीर महामार्गावरील नळेगाव येथील पुलाशेजारील पर्यायी रस्ता वाहून गेल्याने उदगीर लातूर महामार्ग पूर्णपणे बंद आहे. तसेच पावसामुळे रेना मध्यम प्रकल्पात 2 टक्के पाणीसाठा वाढलाय. शिरूर अनंतपाळ उदगीर राज्य महामार्गावर रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे पर्यायी पूल उभा करण्यात आला होता. तोही पावसामुळे वाहून गेल्याने हा रस्ता ही बंद आहे. तिकडे धाराशिव जिल्ह्यातही कालपासून मुसळधार पाऊस बरसतोय. जिल्ह्यातील उमरगा लोहारा तालुक्यातील पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. माडस मुरूम येणेगुर तुटोरी या गावातील नदी नाले तुडुंब वाहताहेत तसेच कळंब धाराशिवसह अनेक भागातही मान्सूनची जोरदार बॅटिंग सुरू आहे. धाराशिव शहरातील बस स्थानकातही पाणी साचल्यामुळे तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
धाराशिव जिल्ह्यात गेली दोन दिवसापासून मान्सून सक्रीय झाला, जिल्ह्यातील उमरगा लोहारा भागात मुसळधार पाऊस बरसला आहे. तर जिल्ह्यातील उर्वरित भागात देखील पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकरी राजा सुखावला असुन उमरगा तालुक्यातील कदेर एकुर्गा नांगरवाडी गावात मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. तर अनेक गावांचा देखील संपर्क तुटला आहे. जिल्ह्यात सुरू असलेला या पावसामुळे आगामी काळात पेरणीची लगबग देखील सुरू होणार आहे.