बीड दि. १० (प्रतिनिधी)- जिजाऊ, ज्ञानराधा, साईराम, राजस्थानी मल्टीस्टेटमधील घोटाळे ताजे असतांनाच बीड जिल्ह्यातील असाच आणखी एक घोटाळा समोर आला आहे. वडवणी येथील लक्ष्मीमाता अर्बन क्रेडिट निधी लिमिटेड शाखेत ७९ लाख ६७ हजार ३२४ रूपयांचा अपहार उघडकीस आला आहे.
वडवणी येथील लक्ष्मीमाता अर्बन क्रेडिट निधी लिमिटेडचे ठेवीदार लालसाहेब निवृत्ती आंधळे (रा. पिंपळारूई ता. वडवणी) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, लक्ष्मीमाता अर्बन शाखेत चेअरमन व व्यवस्थापक यांनी संगनमत करून माझ्यासह इतर ठेवीदारांना त्यांच्या बँकेत जास्त व्याजदर देवू असे सांगुन ठेवीदारांचा विश्वास संपादन केला. नंतर मात्र विश्वासघात करून ठेवीदारांची दिशाभूल करून ७९ लाख ६७ हजार ३२४ रूपयांचा अपहार करून फसवणूक केली. या प्रकरणी चेअरमन परमेश्वर गुलाब राठोड (रा. नाळवंडी ता. बीड), शाखा व्यवस्थापक रामराज नागोराव तिडके (रा. चिंचवण ता. वडवणी) या दोघांविरूध्द कलम ४२०, ४०६, ४०९, ३४ भांदवीसह ३, ४ महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम प्रमाणे वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन सपोनि सिरसाट पुढील तपास करत आहेत.