Advertisement

जनतेचा विश्वास पुन्हा संपादन करण्याकरीता जीवाचं रान करू

प्रजापत्र | Friday, 07/06/2024
बातमी शेअर करा

मुंबई - लोकशाहीमध्ये जनता जनार्दन सर्वस्व असते. जनतेने दिलेला कौल विनम्रपणे आम्ही स्वीकारलेला आहे. जनतेचा आमच्याबद्दलचा जो काही विश्वास कमी झालेला आहे, तो विश्वास पुन्हा संपादन करण्याकरीता आम्ही जीवाचे रान करू, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. आमदारांशी चर्चा केल्यानंतर काही नोंदी घेतल्या असून त्यातून काही निर्णय घेऊन आम्ही पुढची वाटचाल करणार आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

 

 

 

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि महायुतीचा दारुण पराभव झाल्यानंतर गुरुवारी सकाळी अजित पवार गटाच्या कोअर कमिटीची बैठक आणि त्यानंतर सायंकाळी ट्रायडेंट हॉटेलमध्ये आमदारांची बैठक पार पडली. त्यानंतर रात्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे उपस्थित होते. या दोन्ही बैठकीत लोकसभेत कशाप्रकारे निकाल लागले याबद्दल चर्चा करण्यात आली.  

 

 

अजित पवार म्हणाले की, आमचे आमदार विरोधकांच्या संपर्कात आहेत, अशा ज्या बातम्या येत आहेत त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. सर्व आमदार आमच्यासोबत आहेत. हे चित्र आजच्या बैठकीत पहायला मिळाले, असेही अजित पवार यांनी विरोधकांना टोला लगावताना सांगितले. 

यावेळी अजित पवार यांनी बारामतीमध्ये झालेल्या पराभवाबाबतही आपली भूमिका मांडली. बारामतीचा जो कौल लागला आहे त्यामुळे मी स्वतः आश्चर्यचकित झालो आहेच, शिवाय मी अनेक वर्षे तिथे काम करतोय. कोणत्याही निवडणूका झाल्या तरी प्रचंड पाठिंबा बारामतीकरांनी मला दिलेला होता. यावेळेला काय घडलंय माहीत नाही, असेही अजित पवार म्हणाले.  

Advertisement

Advertisement