‘अति सर्वत्र वर्ज्यते’ असे एक संस्कृत सुभाषित आहे. या ठिकाणी संस्कृती सुभाषिताचा दाखला यासाठी की स्वत:ला संस्कृतीचा एकमेव संरक्षक म्हणणार्या भाजपाला या ‘देवभाषे’तून काहीतरी शिकायला मिळाले असेल असे वाटत होते. परंतु मागच्या दहा वर्षात भाजपाच्या सरकारने देशात जे काही उत्पात माजविले आणि कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला त्याचा परिणाम म्हणून २०२४ चे निकाल आले आहेत. सत्तेचा गैरवापर फारकाळ सामान्य माणूस सहन करत नाही आणि वेळ आल्यावर त्याचे उत्तर देतो हेच या निकालांनी स्पष्ट केेले आहे. अगदी रामाचे राजकारण करण्याचा अतिरेक अयोध्येला देखील पटला नाही यातच सारे काही आले.
लोकसभा निवडणुका सुरु होण्याच्या काही काळ अगोदर ज्यावेळी देशात विरोधी पक्षांनी इंडिया म्हणून आघाडी सुरू केली होती. त्यावेळी या आघाडीची खिल्ली उडवायला नरेंद्र मोदी आणि अमित शहा सर्वात पुढे होते. मागच्या काही वर्षात नरेंद्र मोदी म्हणजे जणू काही या भारतवर्षातील एकमेव‘ राष्ट्रपुरुष’ आहेत असेच वातावरण भाजपावाले देशभर करीत होते. मोदीशिवाय भारताला चेहराच नाही असे कांहीं सांगण्याचा प्रयत्न सातत्याने भाजपाकडून होत होता आणि त्यामुळेच मोदींशिवाय राजकारणात इतर कोणीच टिकणार नाही. त्यामुळे इंडिया आघाडी काय? किंवा आणखी कोणी काय? भाजपाच्या सत्तेला सुरूंग लावण्याचे स्वप्न देखील कोणी पाहू नये अशी अतिरेकी भाषा भाजपाची होती.
सत्तेच्या मस्तीत सार्या संवैधानिक संकेताना चूड लावण्याचे काम केंद्रीय सत्ता अनिर्बंधपणे करीत होती. निवडणूक आयोगापासून ते राजभवनापर्यंत बहुतांश संवैधानिक संस्था आपल्या संपूर्णपणे कह्यात घेऊन त्यांना आपल्या घर गड्यासारखे राबविण्याचा अतिरेक भाजपाकडून सातत्याने होत होता. आपण काहीही केले तरी कोणी काहीच करु शकत नाही याच मस्तवालपणात मोदी सरकारची मागची पाच वर्षे गेली. तरीही मागच्या पाच वर्षात अनेक ठिकाणी मोदींच्या धोरणांना विरोध होत होता. पण हा विरोध आपल्याला हरवू शकत नाही असल्या अवाजवी विश्वासातच भाजप होता. परिणामी आपण जे काही करतो आहोत त्याचे म्हणून काही दुष्परिणाम होतील हे भाजपाच्या गिनतीतही नव्हते. म्हणूनच ईडी, सीबीआय, आयकर विभाग अशा संस्थांचा वापर करून देशातील विरोधी पक्षच संपवायचा असा हट्टाग्रह भाजपाने सातत्याने केला. महाराष्ट्र असेल मध्यप्रदेश असेल किंवा आणखी कोणती राज्य त्या ठिकाणी इतर राजकीय पक्षांची तोडफोड केली. पश्चिम बंगालमध्ये राजभवनाचा वापर करून तेथील लोकनिर्वाचित सरकारच्या कामामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. दिल्लीमध्ये देखील आपच्या सरकारला सातत्याने अडचणी आणल्या. ज्या ज्या राज्यांमध्ये म्हणून भाजपा विरोधकांची सत्ता होती त्या त्या ठिकाणी भाजपाने मागच्या पाच वर्षात जे काही केले तो सरळ सरळ सत्तेचा गैरवापर होता. हा अतिरेक सामान्यांना रुचला नाही हेच आता जनमताच्या कौलाने स्पष्ट झाले आहे.
राहुल गांधी, अखिलेश यादव, तेजस्वी यादव आणि इतर विरोधी पक्षातील नेत्यांना जणू काही किंमतच नाही हे जे दाखविण्याचा प्रयत्न मोदींकडून होत होता. महाराष्ट्रासारख्या राज्यात शरद पवारांसारख्या जेष्ठ नेत्याला ‘भटकती आत्मा’ म्हणून हिणविण्याचा जो उद्दामपणा मोदींनी केला. उत्तर प्रदेश असेल की महाराष्ट्र या राज्यांमध्ये तो उद्दामपणा भाजपाला नडला. नशीब ओडीशा सारख्या राज्याने आणि काही प्रमाणात जेडीयु, तेलगू देशम सारख्या मित्र पक्षांनी आणि मध्यप्रदेशात शिवराजसिंह चौहानानी बाजू काहींशी सावरली. अन्यथा एनडीएचे पानिपत व्हायला वेळ लागला नसता. भाजपाने ज्या ज्याठिकाणी अतिरेक केला. मग तो सत्तेचा असेल, धार्मिक विद्वेषाचा असेल, सामाजिक दरी निर्माण करण्याचा असेल, शेतकरी, शेतमजूरांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचा असेल त्या त्याठिकाणी भाजपाच्या विरोधात सामान्य मतदाराने विरोधी पक्षाला भरभरून बळ दिले आहे. हा जनादेश भाजपासाठी एक मोठा धडा आहे हे सारे लिहित असताना १७ वी लोकसभा विसर्जित करण्यात आली असून १८ व्या लोकसभेची घोषणा केली जाईल. एकंदर कल पाहता एनडीएमध्ये फारशी फाटाफूट होण्याची शक्यता आज तरी दिसत नाही. त्यामुळे एनडीए सत्तेवर येईल. कदाचित मोदीच पंतप्रधानही असतील. पण जो एककल्ली कारभार त्यांना मागच्या दहा वर्षात करता आला किंंवा त्यांनी केला. तो एककल्लीपणा आता मात्र त्यांना जमणार नाही. अतिरेकाला सामान्य मतदारांनी मारलेल्या चपराकीचे वळ गालावर घेऊनच आता मोदींना खर्या अर्थाने सर्वांना सोबत घेऊन काम करावे लागेल आणि ती त्यांची परीक्षा असेल.
ReplyForward
Add reaction |