दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज ( दि.२ जून) दुपारी तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केले. दिल्ली मद्य धोरण प्रकरणी ईडीने केलेल्या अटकेनंतर लोकसभा निवडणूक प्रचारासाठी त्यांना सर्वोच्च न्यायालयाने २१ दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. याची मुदत शनिवार १ जून रोजी संपली होती.
आत्मसमर्पणापूर्वी दुपारी तीन वाजता केजरीवाल आपल्या निवासस्थानातून राजघाटवर गेले. येथे त्यांनी महात्मा गांधी यांना आदरांजली वाहली. यानंतर केजरीवाल आणि त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर केजरीवाल हे आम आदमी पार्टी कार्यालयात पोहोचले. येथे त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी केंद्र सरकारवर जाेरदार हल्लाबाेल केला. यानंतर ते तिहार कारागृहाकडे रवाना झाले. सायंकाळी पाच वाजता यांनी तिहार कारागृहात आत्मसमर्पण केले.
सर्वोच्च न्यायालयाचे आभार
पक्ष कार्यालयात बोलताना केजरीवाल म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयाने मला निवडणुकीच्या प्रचारासाठी २१ दिवसांचा जामीन मंजूर केला. त्याबद्दल मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. आज मी पुन्हा तिहार तुरुंगात जात आहे. या २१ दिवसांपैकी एक मिनिटही मी वाया घालवला नाही. मी फक्त आम आमदी पार्टीसाठी प्रचार केला नाही तर मुंबई, हरियाणा, UP, झारखंड मध्ये गेलो. आपल्यासाठी देश महत्वाचा आहे. मी हुकूमशाहीविरुद्ध आवाज उठवला म्हणून पुन्हा तुरुंगात जात आहे. पंतप्रधान मोदींनी देशासमोर हे मान्य केले की त्यांच्याकडे माझ्याविरुद्ध कोणताही पुरावा नाही”