Advertisement

फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य

प्रजापत्र | Sunday, 02/06/2024
बातमी शेअर करा

अठराव्या लोकसभा निवडणुकीत कुणी बाजी मारलीय आणि देशातील जनतेने केंद्रातील सत्ता कुणाकडे सोपवलीय याचा निकाल लागण्यास आता ४८ तासांहून कमी काळ उरला आहे. दरम्यान, काल सातव्या टप्प्यातील मतदान आटोपल्यानंतर विविध संस्थांनी केलेल्या एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. तसेच त्यामधून केंद्राममध्ये नरेंद्र मोदी हे मोठ्या मताधिक्यासह पुन्हा एकदा सत्तेवर विराजमान होतील, असे संकेत मिळत आहेत. पण महाराष्ट्रामध्ये मात्र भाजपा आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला मोठं नुकसान होण्याची शक्यता अनेक एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ एकनाथ खडसे यांनी भाजपाला टोला लगावला आहे. फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य असल्याचं विधान त्यांनी केलं आहे. 

 

 

 

काल प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलमधील महाराष्ट्रातील अंदाजाबाबत बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, निश्चितपणे राज्यात जे फोडाफोडीचं राजकारण झालेलं आहे.  त्याचा फटका भाजपाला बसताना दिसत आहे. राज्यभरातील चित्र पाहिलं तर फोडाफोडीचं राजकारण मतदारांनी अमान्य केलेलं दिसत आहे. अजित पवार यांनी आपला पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस ताब्यात घेतला. तर उद्धव ठाकरेंचा पक्ष हा एकनाथ शिंदे यांच्याकडे गेला. ज्यांनी हे पक्ष उभे केले, त्यासाठी मेहनत घेतली, त्यांच्या हातातून हे पक्ष इतरांच्या हातात जाणं, हा फोडाफोडीच्या राजकारणाचा परिणाम असल्याचं जनतेला वाटलं. त्यामुळे या निवडणुकीत अजित पवार यांना फारसा प्रतिसाद या निवडणुकीत मिळाला नसल्याचे दिसत आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला दिसत नाही आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले. 

 

 

तसेच या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष राहील, असं भाकितही एकनाथ खडसे यांनी केलं. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांचा पक्ष हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष राहील, असं चित्र दिसतंय. तर शरद पवार यांनी लढवलेल्या दहा पैकी ८ किंवा सहा जागा निवडून येतील, असं एक्झिट पोलमध्ये सांगताहेत, असा दावाही एकनाथ खडसे यांनी केला. 

दरम्यान, काल प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलमध्ये काही एक्झिट पोलमधून महायुतीला २२ पर्यंत जागा देण्यात आल्या होत्या. तर काही एक्झिट पोलमधून महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात बरोबरीची लढत होईल, असा दावा करण्यात आला होता. तर काही मोजक्या एक्झिट पोलममधून महायुतीला २८ ते ३२-३३ पर्यंत जागा देण्यात आल्या होत्या. 

Advertisement

Advertisement