Advertisement

 संपादकीय अग्रलेख- आंदोलनाचे राजकारण

प्रजापत्र | Friday, 31/05/2024
बातमी शेअर करा

        भाजपला परिवर्तनवादी महापुरुषांबाबत खरोखर प्रेम असते तर ज्यावेळी संघ स्वयंसेवक राहिलेले आणि पूर्वाश्रमीचे भाजपेयी असलेले तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी महापुरुषांबद्दल मुक्ताफळे उधळत असताना भाजपवाल्यानी असाच उर बडवायला पाहिजे होता. मात्र त्यावेळी एकाही भाजपवाल्याने कोश्यारींना जाब विचारणे तर दूर, त्यांचा साधा निषेध करणे देखील जमले नव्हते. त्यामुळे आता ज्या प्रकरणात जितेंद्र आव्हाडांनी माफी मागितली आहे, त्या प्रकरणात बाबासाहेबांचे नाव पुढे करून भाजप करीत असलेले आंदोलन म्हणजे केवळ राजकारण आहे.
        शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील श्लोकांचा समावेश करण्याच्या धोरणाचा निषेध म्हणून जितेंद्र आव्हाडांनी जे आंदोलन केले, त्यात बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडण्यात आला होता. झाला प्रकार अनवधानाने झाल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी लगेच स्पष्ट केले, तसेच या कृतीमुळे आंबेडकर प्रेमींच्या ज्या भावना दुखावल्या त्याबद्दल माफी देखील मागितली. बाबासाहेब हे केवळ या देशाला संविधान देणारे म्हणूनच नव्हे तर एकूणच समाजाला परिवर्तनाची दिशा देणारे म्हणून सर्वांनाच आदरणीय आहेत, त्यामुळे त्यांची प्रतिमा फाडण्याच्या कृतीचे समर्थन कोणीच करणार नाही, होऊच शकणार नाही. पण यासंदर्भाने जितेंद्र आव्हाडांनी माफी मागितल्यानंतर खरेतर हा विषय संपवायला पाहिजे होता. मात्र आंबेडकरवाद्यांच्या या विषयात भावना तीव्र होत्या, जे की साहजिक देखील आहे, त्यामुळे त्यांनी याबाबतीत कायदेशीर कारवाईचे पाऊल उचलले. यासंदर्भाने जितेंद्र आव्हाड आणि कार्यकर्त्यांवर वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हे दाखल झाले, त्यातही कांहीच आक्षेपार्ह नाही. मात्र आता हा विषय पुढे करून भाजपने राज्यभरात जे आंदोलन सुरु केले आहे, त्यावर भाष्य होणे आवश्यक आहेच.

 

 

      मुळातच हा सारा विषय सुरु झाला तो शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील श्लोकांचा समावेश करण्याचे धोरण राज्य सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले आणि त्यावर सूचना, हरकती मागविण्यात आल्या त्यावरून. मनुस्मृतीबद्दल भाजप आणि संघ परिवाराचे असलेले प्रेम सर्वश्रुत आहे. मुळातच मनुस्मृतीचा काय, जे जे काही रूढीवादी, विषमतावादी, वर्णव्यवस्था आणि भेदाभेदाचे समर्थन करणारे असते, त्याला बळ देण्याचे काम भाजप सातत्याने करीत आला आहेच. त्यात काही नवीन नाही. पुरोगामी विचारांची, परिवर्तनवादी विचारांची कायम टर उडविण्याचे काम भाजप आणि संघ परिवारातील अनेक घटकांनी केलेले आहे. अगदी समता या संकल्पनेला छेद देण्यासाठी 'समरसता' सारखे गाजर दाखविण्याचे काम संघ परिवार करीत आला आहे. त्यामुळे मनुस्मृतीमधील श्लोक अभ्यासक्रमात घुसविण्याचे भाजपचे धोरण नवीन नाही. या धोरणाला साहजिकच पुरोगामी महाराष्ट्रात विरोध होणार होताच. अगदी सत्तेच्या वर्तुळातून देखील छगन भुजबळ यांनी या धोरणाला विरोध केलाच. त्यामुळेच आता या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला गालबोट लावण्याची आयतीच संधी जितेंद्र आव्हाड प्रकरणामुळे भाजपला मिळाली आहे, ती संधी भाजप कशी दवडणार? खरेतर भाजपला डॉ.बाबासाहेब आंबेडकर किंवा त्यांच्या विचारांबद्दल थोडी जरी आस्था असती, तर भाजपने मनुस्मृतीमधील श्लोकाला विरोध केला असता, मात्र भाजप काय किंवा संघ परिवार काय, त्यांना बाबासाहेब किंवा त्यांचे विचार कधीच पचले नाहीत. त्यांचे महात्मा गांधी काय किंवा बाबासाहेब काय, यांच्यावरील प्रेम कायम बेगडी राहिलेले आहे. संघाच्या शाखेत प्रातःसमरणासाठी जो श्लोक घेतला जातो, त्यात बाबासाहेबांना स्थान देण्यात आले आहे हे वास्तव आहे, मात्र त्या पलीकडे बाबासाहेबांच्या कोणत्याच विचारांचा अंगीकार संघ किंवा भाजप करताना दिसत नाही. म्हणूनच जे मनुस्मृतीमधील श्लोक अभ्यासक्रमात आणायला निघाले आहेत, त्यांना बाबासाहेबांचे नाव पुढे आले करून आंदोलनाचे राजकारण करण्याचा अधिकार राहतो काय?

 

 

     मुळातच भाजपला बाबासाहेबच नाही, सर्वच परिवर्तनवाद्यांबद्दल एक प्रकारचा आकस राहिलेला आहे. भाजपच्या अनेक नेत्यांच्या विधानांमधून ते समोर आलेले आहेच. भाजपने म्हणजे केंद्रीय सत्तेने महाराष्ट्राच्या माथी जे संघाळलेले राज्यपाल मारले होते, आणि ज्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला छेडण्याचा काम केले, त्या भगतसिंग कोश्यारींनी ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा महात्मा फुले, सावित्रीमाई फुले यांच्याबद्दल अनुदगार काढले होते, त्यावेळी आज आंदोलन करणारे भाजपवाले कोठे गेले होते? त्यावेळी एकही भाजपवाल्याला कोश्यारींचा साधा निषेध करावा असेही वाटले नव्हते, मग आताच आव्हाडांचा निषेध करण्यासाठी हे भाजपवाले कसे पुढे आले? जितेंद्र आव्हाडांकडून जे काही घडले ते चुकीचेच, पण त्यासाठी त्यांनी माफी मागितली आहे. जे कोणी जितेंद्र आव्हाडांना ओळखतात, त्यांना आव्हाडांचे सामाजिक चारित्र्य चांगलेच माहित आहे. 'बाबासाहेब हा माझा वैचारिक बाप आहे' अशी भूमिका आव्हाडांनी जाहीरपणे घेतलेली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला किती ताणायचे हे ठरवायला हवे. खुद्द प्रकाश आंबेडकरांनी देखील तशीच भूमिका घेतली आहे. यात आंबेडकर प्रेमींचा संताप अजूनही सजू शकतो, मात्र भाजप जे ठिकठिकाणी आंदोलन करीत आहे, ते निव्वळ राजकारण असून मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या मूळ मुद्द्यापासून सामान्यांचे लक्ष विचलित करण्याच्या मोहिमेचा भाग असावा असेच चित्र आहे.

Advertisement

Advertisement