टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यास अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. यंदा विजेतेपदासाठी २० संघांमध्ये स्पर्धा रंगणार आहे. ज्यासाठी पाच-पाच संघांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातून दोन संघ सुपर-८ फेरीत प्रवेश करतील. त्यानंतर उपांत्य आणि अंतिम सामने होतील. पण ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अर्थात आयसीसीने एका युगांडा संघाच्या जर्सीवर आक्षेप नोंदवत बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत या संघाला टी-२० विश्वचषकासाठी नवीन जर्सी लाँच करावी लागली आहे.
वास्तविक, टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी लाँच करण्यात आलेल्या युगांडाच्या जर्सीवर खांद्याजवळ पक्ष्याची पिसे होती. या डिझाइनमुळे प्रायोजक लोगो व्यवस्थित दिसत नव्हता. अशा परिस्थितीत आयसीसीने या जर्सीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. युगांडाची ही जर्सी ग्रे क्राउनड क्रेन या त्यांच्या राष्ट्रीय पक्ष्यापासून प्रेरित आहे. त्यामुळे जुन्या जर्सीमध्ये महत्त्वाचे बदल करून नवीन जर्सी तयार करण्यात आल्याचे युगांडा क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे.
युगांडाचा संघ क गटात
युगांडाचा संघ प्रथमच टी-२० विश्वचषकात सहभागी होत असून या स्पर्धेसाठी त्याला क गटात स्थान देण्यात आले आहे. युगांडा व्यतिरिक्त या गटात वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, पापुआ न्यू गिनी आणि अफगाणिस्तानचे संघ आहेत. युगांडाने आफ्रिका पात्रता स्पर्धेच्या क्षेत्रीय स्पर्धेत नामिबियाला मागे टाकून दुसरे स्थान मिळवले आणि टी-२०वर्ल्डकप खेळण्याचे तिकीट मिळवले. स्पर्धेत त्यांचा पहिला 3 जूनला अफगाणिस्तानविरुद्ध आहे.
टी-२० साठी युगांडाचा संघ :
ब्रायन मसाबा (कर्णधार), रियाजत अली शाह (उप-कर्णधार), केनेथ वायस्वा, दिनेश नाकराणी, फ्रँक न्सुबुगा, रौनक पटेल, रॉजर मुकासा, कॉस्मास क्यावुता, बिलाल हसन, फ्रेड अचेलम, रॉबिन्सन ओबुया, सायमन सेसाजी, हेन्री सेसेंडो, अल्पेश रामजानी आणि जुमा मियाजी.
राखीव खेळाडू : रोनाल्ड लुटाया आणि इनोसंट म्वेबाज.
ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह : इनोसंट म्वेबेझ, रोनाल्ड लुटाया.