नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे २ जूनपर्यंत जामिनावर बाहेर आहेत. त्यांना जेलमध्ये जावं लागणार आहे. परंतु पुढेही जामीन मिळावा, यासाठी केजरीवालांनी राऊज अव्हेन्यू कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टात धक्का बसल्यानंतर केजरीवालांनी हा नवीन डाव टाकला आहे.
दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात अरविंद केजरीवाल यांनी रेग्युलर आणि अंतरिम दोन्ही जामीन याचिका दाखल केल्या आहेत. गुरुवारी दुपारी दोन वाजता सुनावणी झाली तेव्हा ईडीने अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेला विरोध केला.ईडीने भर कोर्टात प्रश्न उपस्थित केला की, जर त्यांची प्रकृती खराब आहे तर ते इतक्या जोरजोरात निवडणुकीचा प्रचार का करत आहेत? अबकारी धोरण घोटाळ्यात अटक झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी पहिल्यांदाच नियमित जामिनाला अर्ज केला. सध्या ते अंतरिम जामिनावर १ जूनपर्यंत जेलच्या बाहेर आहेत.
ईडीच्या वतीने एएसजी एसव्ही राजू यांनी अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर उत्तर दिलं. ते म्हणाले की, मला आत्ताच एक कॉपी मिळाली आहे. मला उत्तर दाखल करण्यासाठी वेळ पाहिजे. अरविंद केजरीवाल हे पंजाबमध्ये निवडणुकीचा प्रचार करत आहेत. त्यांची प्रकृती त्यांना प्रचार करण्यापासून रोखत नाही, हे विशेष. त्यांनी मोठ्या जोशात पक्षाचा प्रचार केला आहे आणि आता अंतिम टप्प्यात जामीन याचिका दाखल केली आहे. परंतु त्यांच्या वागणुकीनुसार त्यांना जामीन मिळाला नाही पाहिजे, असा युक्तिवाद ईडीच्या वकिलांनी केला.