Advertisement

महायुतीच्या अपयशी कारभारामुळे मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच

प्रजापत्र | Thursday, 30/05/2024
बातमी शेअर करा

छत्रपती संभाजीनगर - मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. पिंपळखुंटा या गावातील विठ्ठल दाभाडे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. शेती गहाण ठेऊन काढलेल्या कर्जाचे बँक पैसे देत नाही. बँक मॅनेजरने कर्जाचे पैसे खात्यात जमा करायला टाळाटाळ केल्यामुळे या शेतकऱ्याने  आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाचा हा गंभीर आरोप आहे. या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करत महायुती सरकारच्या अपयशी कारभारामुळे आत्महत्या सुरु असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. त्याचबरोबर दाभाडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन या कुटुंबीयांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे असल्याचा विश्वास त्यांनी दिला.

 

 

छत्रपती संभाजीनगर येथील पिंपळखुंटा गावातील विठ्ठल नामदेव दाभाडे वय ५२ वर्ष यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. एका खाजगी बँकेकडे चार महिन्या पूर्वी शेती तारण ठेवून कर्ज मागणी केली असता बँकेने शेती गहाण ठेवून चार पाच महिने झाले तरी बँकेचे शाखाधिकारी पैसे खात्यावर टाकण्यासाठी टाळाटाळ करत राहिले. त्यामुळे निराश होऊन दाभाडे या शेतकऱ्यांने आत्महत्या केली. विठ्ठल दाभाडे यांनी आत्महत्या करताना  चिठ्ठी लिहली असून यामध्ये बँक मॅनेजर पैसे द्यायला टाळाटाळ करत असल्याचे म्हटले आहे. आता मी खचलो..मी माझ्या नशिबावर नाराज आहे. कर्ज मंजूर होऊन तब्बल चार महिने कर्जाची रक्कम खात्यात टाकली नाही, असे या चिट्ठीत म्हटले आहे.बँक मॅनेजर आणि एजंट पैसे मागत असल्याची देखील तक्रार दाभाडे कुटुंबीयांची आहे. हे प्रकरण गंभीर असून महायुती सरकारचे हे अपयश आहे. सरकारने  या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे, आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत, अशी मागणी श्री. वडेट्टीवार यांनी केली आहे.

Advertisement

Advertisement