Advertisement

संपादकीय अग्रलेख- निकालात अव्वल,गुणवत्तेचे काय?

प्रजापत्र | Thursday, 30/05/2024
बातमी शेअर करा

  राज्य मंडळाने घेतलेल्या परीक्षेत बारावी पाठोपाठ दहावीतही बीड जिल्हा निकालामध्ये विभागात अव्वल आला आहे. जिल्ह्याचा निकाल विभागात सर्वाधिकच नव्हे तर राज्याच्या सरासरीपेक्षाही अधिक लागला याबद्दल या प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व घटकांचे मनमोकळे अभिनंदन. जिल्ह्याची गुणवत्ता वाढीस लागत असेल तर त्यासाठी 'मेहनत' घेणारे सर्वच कौतुकासाठी पात्र आहेतच. मात्र एकीकडे निकालाचा टक्का वाढत असताना दहावी उत्तीर्ण विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी लातूर किंवा इतर मंडळांची निवड का करतो आणि बारावीत मोठे टक्के मिळविलेल्या गुणवंतांचे पुढे काय होते याचेही कधीतरी आत्मपरीक्षण होणार आहे का?
 

 

      राज्यातील स्वतःला उच्चभ्रू समजणाऱ्या, किमानपक्षी मध्यमवर्गीय असणाऱ्या पण आम्ही देखील कशातच मागे नाहीत असे दाखविण्यासाठी धडपडणाऱ्या बहुतांश पालकांची पाल्य सीबीएसई (केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ ) किंवा आयसीएसई (आंतरराष्ट्रीय माध्यमिक परीक्षा परिषद) यांच्याकडे वळले असतानाही राज्य मंडळाच्या परीक्षांचे निकाल अजूनही सर्वांच्या उत्सुकतेचे विषय आहेत आणि त्या निकालानंतर वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने भरून येतात, हे देखील काही कमी नाही. मुळातच अगदी गावागावात इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पीक मोठ्याप्रमाणावर वाढले असताना आणि त्या शाळांचा कल सीबीएसई कडे अधिक असतानाही राज्य शिक्षण मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण फारसे घटलेले नाही हे देखील तसे लक्षणीयच. तर राज्य मंडळाच्या बारावी आणि दहावीच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. दहावीला 'बेस्ट ऑफ फाईव्ह' नावाची पद्धती स्वीकारण्यात आल्याने आता टक्केवारीची नव्वदी म्हणजे फारशी 'अप्राप्य' म्हणावी अशी काही राहिलेली नाही. त्याचे सार्वत्रिकीकरण झाले आहे, असे म्हटले तरी ते अतिशयोक्तीचे होणार नाही असे चित्र राज्यात आहे. त्यामुळे दहावीचा निकाल यावर्षी देखील 'जोरदार ' लागला असेच म्हणावे लागेल. त्यातही छत्रपती संभाजीनगर मंडळातून दहावी आणि बारावी दोन्ही परीक्षांमध्ये बीड जिल्हा मंडळात अव्वल आला आहे. त्याबद्दल जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राचे अभिनंदनच.
     शाळेचा, संस्थेचा, जिल्ह्याचा निकाल चांगला लागलाच पाहिजे, त्याशिवाय प्रवेशाच्या जीवघेण्या स्पर्धेत टिकाव लागणे अवघड , त्यामुळे हा निकाल लावण्यासाठी जे जे कोणी म्हणून धडपडत होते त्या सर्वांचे देखील अभिनंदन. हे धडपडणे वेगवेगळ्या अंगानी आहे. जे कोणी लोक दहावीची अगदी मागच्या काही वर्षांपासून किंवा बारावीसाठी अकरावी पासूनच विद्यार्थ्यांवर मेहनत घेत होते, त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. कारण जिल्ह्याच्या गुणवत्तेच्या निर्देशांकाबद्दल यापूर्वी अनेकदा गंभीर बाबी समोर आलेल्या असतानाही, त्यापासून विचलित न होता विद्यार्थी घडविण्याचे काम ज्या शिक्षकांनी केले, त्यांचे खरेच कौतुक.

 

 

पण 'धडपणारा' एक दुसराही संप्रदाय जिल्ह्यात आहेच. ग्रामीण भागातील , दूरस्थ किंवा शहरातही 'संरक्षित' असे परीक्षा केंद्र , अगदी ग्रामीण भागातल्या शाळेतही पार मुंबई पुण्यापासूनचे प्रवेश, विद्यार्थी केवळ प्रवेशाला जिल्ह्यात पण क्लासेसला लातूरपासून ते अगदी कोट्यापर्यंत , आणि मग अशा विद्यार्थ्यांसाठी रात्रंदिवस 'श्रमणारे' शिक्षक , प्राध्यापक. जोडीला परीक्षेच्या काळात परीक्षा केंद्रांना आलेले जत्रेचे स्वरूप, अगदी दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यावरील खिडकीला लटकून आपल्या पाल्याला 'शुभेच्छा' देणारे पालक, त्या पालकांना सहकार्य करणारी त्या केंद्रावरील 'सारीच' व्यवस्था हे देखील जिल्ह्याने पहिले आहेच. मंडळाची भरारी पथके देखील होती म्हणे, पण त्यांना हे असले काही 'दिव्यदर्शन' एकतर झाले नसावे किंवा त्यांच्याकडे ती 'दृष्टी' देखील नसावी , तर अशा केंद्रांची संख्या देखील जिल्ह्यात कमी नाही. किंबहुना असल्या 'दिव्य' व्यवस्थेचा जिल्ह्याचा निकाल वाढविण्यात मोठा वाटा आहे. त्यामुळे या व्यवस्थेच्या प्रत्येक 'शिलेदारांचे ' अभिनंदन केल्याशिवाय जिल्ह्याचे यश परिपूर्ण कसे होईल?

 

 

मागच्या अनेक वर्षात दहावीच्या परीक्षेचे निकाल लागल्यानंतर येथील विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी लातूर, पुणे किंवा इतर विभागीय मंडळाची निवड करतात. आता ७० :३० चे सूत्र फारसे राहिलेले नसले तरी इतर विभागात 'प्रामाणिक शिक्षणासाठी' जाणारी संख्या मोठी आहे. मग ज्या जिल्ह्याचा निकाल विभागात अव्वल असतो, त्या जिल्ह्यात पुढील करिअर करण्याची हिम्मत विद्यार्थी का दाखवित नाही, याचा कधीतरी सर्व व्यवस्थेने गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. कारण स्वतःला पांढरपेशा म्हणवणाऱ्या, उच्चभ्रू आणि अगदी उच्च मध्यमवर्गीयांनी देखील राज्य मंडळाला राम राम ठोकण्याचा सपाट लावला आहे. आता राज्य मंडळात असणारे बहुतांश गोरगरीब, निम्न मध्यमवर्गीय, अल्पउत्पन्न किंवा हातावर पोट 
असणारांचे पाल्य आहेत. त्यांचे करिअर आणि शैक्षणिक भवितव्य किमान सुरक्षित राहावे यासाठी तरी व्यवस्थेने निकाल आणि गुणवत्ता यातील तफावतीचे आत्मचिंतन करायला हवे. निकालाच्या टक्क्यामुळे हुरळून न जाता गुणत्तेच्या बाबतीत चिंतन व्हायला हवे.
 

Advertisement

Advertisement