Advertisement

जितेंद्र आव्हाडांची जाहीर माफी!

प्रजापत्र | Wednesday, 29/05/2024
बातमी शेअर करा

 मुंबई : शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या समावेशाच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज महाड येथील क्रांतीस्तंभ इथं मनुस्मृतीचं दहन करून याचा निषेध केला. पण यावेळी त्यांच्याकडून मनुस्मृतीच्या पोस्टरवर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो अनावधानानं फाडला गेला. यानंतर हे प्रकरणं चांगलंच तापल्यानंतर आता आव्हाडांनी या प्रकरणावर जाहीर माफी मागत पडदा टाकला आहे.  

 

 

 

आव्हाडांनी यासंदर्भात व्हिडिओ शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटलं की, शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचां समावेश करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे.याचा विरोध म्हणून आज महाड येथील क्रांती स्तंभ येथे मनुस्मृतीचे दहन करून याचा निषेध केला. हे करत असताना अनवधानाने माझ्याकडून एक मोठी चूक घडली.मनुस्मृतीचे निषेध करणारे पोस्टर्स काही कार्यकर्त्यांनी आणले होते, त्यावर बाबासाहेब आंबेडकर यांचे देखील चित्र होते. मनुस्मृती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एकत्रित चित्र असणारे हे पोस्टर माझ्याकडून अनावधाने फाडण्यात आले, मी याबद्दल जाहीर माफी मागतो.

 

गेली अनेक वर्षे मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न करत असतो ही बाब सगळ्यांना माहिती आहे. डॉ. बाबासाहेबांचा माझ्याकडून अनवधानानं झालेला हा अवमान माझ्यादेखील जिव्हारी लागलेला आहे.मी आजवर कोणत्याच बाबींवर माफी मागितलेली नाही. मी कायमच माझ्या भूमिकेवर ठाम राहून ती निभावलेली आहे. मात्र, आज मी माफी मागतोय, कारण हा माझ्या बापाचा अवमान माझ्याकडून झालेला आहे. सर्व आंबेडकरप्रेमी मला माफ करतील, हा मला विश्वास आहे.

Advertisement

Advertisement