नागपूर- शहराच्या सदर, पाचपावली, कळमना आणि अजनी पोलीस ठाण्यांतर्गत चार अनोळखी व्यक्तींचा मृत्यु झाला असून या चारही व्यक्तींचा मृत्यु उष्माघातामुळे झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी २८ मे रोजी रात्री ९ वाजता मेश्राम पुतळा चौक, इस्तंबुल हॉटेलसमोर फुटपाथवर एक ६० वर्षाचा अनोळी व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळला. पोलिसांनी त्याला मेयो रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी फिर्या दी राहुल सुधारकर आडेकर (३६, रा. जागनाथ बुधवारी) यांच्या सुचनेवरून सदर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी रात्री १०.२५ वाजता यशोदिप कॉलनी, जयभीम चौक, गुरुनानक मेडिकलसमोरील फुटपाथवर एक ५० ते ५५ वयोगटातील अनोळखी व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळला. त्याला उपचाराकरीता मेयो हॉस्पीटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मिळालेल्या वैद्यकीय सुचनेवरून पाचपावली पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.
कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी २८ मे रोजी दुपारी १२ वाजता कळमना मार्केट शिवम रेस्टॉरंटसमोर ५० वर्षाचा एक अनोळखी व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळला. त्याला रेस्टॉरंटच्या मालकाने उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी विक्रम सुनिल सुर्यवंशी (४८, रा. भांडेवाडी, पारडी) यांनी दिलेल्या सुचनेवरून कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला आहे. तर अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी २९ मे रोजी सकाळी ८.३० वाजता नरेंद्रनगर ते शताब्दीनगर चौकादरम्यान फायर ब्रिगेड वॉल कंपाऊंडजवळ एक ४५ वयोगटातील अनोळखी व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळला. त्याला उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अजनी पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. दरम्यान शहरातील या चारही अनोळखी व्यक्तींचा मृत्यू उष्माघातामुळे झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.