Advertisement

गावठी कट्याचा धाक दाखवून अधिकाऱ्याचे अपहरण

प्रजापत्र | Wednesday, 29/05/2024
बातमी शेअर करा

केज  - अवादा कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजरचे गावठी कट्टाचा धाक दाखवून अपहरण करीत २ कोटींची  खंडणी मागितल्याची खळबळजनक घटना केजपासून जवळ असलेल्या मांजरसुंबा रस्त्यावरील टोलनाक्यावर घडली. याप्रकरणी १३ जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 

 

     अवादा कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर पदावर कार्यरत असलेले सुनिल केदु शिंदे ( रा. टागोर नगर, नाशिक) हे पवनचक्की प्रकल्प उभारणीच्या कामानिमित्त सध्या बीड शहरात जालना रोड भागात वास्तव्यास असून ते आपल्या सहकाऱ्यांसह २८ मे रोजी सकाळी ११ वाजता बीडहून केजकडे येत असताना वाटेत केजपासून जवळ असलेल्या टोल नाक्याच्या पुढे स्कॉर्पिओच्या (एम. एच. १५ ईबी २६८२) चालकाने त्यांना गाडी थांबविण्याचा इशारा केल्याने सुनील शिंदे यांनी गाडी थांबवली. त्यानंतर स्कॉर्पिओमधील रमेश घुले (रा. केज) याने त्यांना आपण अधिगृहन करीत असलेल्या पवनचक्कीच्या जागेसंदर्भात बोलायचे आहे. असे म्हणत गावठी कट्टाचा धाक दाखवून त्याच्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी बळजबरीने सुनिल शिंदे यांचे त्याच्या स्कार्पिओमध्ये बसवून त्यांना माजलगाव मार्गे खरवंडी (ता. पाथर्डी जि. अहमदनगर) येथे नेले. तेथे त्यांनी सुनिल शिंदे व त्यांचे सहकाऱ्यांकडे काम करायचे असेल तर दोन कोटी रुपये देण्याची खंडणी मागणी केली. सुटका करून घेतल्यानंतर सुनिल शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून रमेश घुले व त्याचे दहा ते बारा साथीदारांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. २८५/२०२४ कलम ३६५, ३८५, १४३, १४७, १४८, १४९ यासह शस्त्र प्रतिबंधक कायदा कलम ४, २५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक आनंद शिंदे हे तपास करीत आहेत.

Advertisement

Advertisement