गडचिरोली- महाराष्ट्र शासनाचे सहा लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या जहाल माओवाद्याने २८ मे रोजी पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केले. गणेश गट्टा पुनेम (३५,रा.बेच्चापाल ता. भैरमगड जि. बिजापूर, छत्तीसगड) असे त्या माओवाद्याचे नाव आहे.
गणेश पुनेमा हा २०१७ मध्ये छत्तीसगडच्या भैरमगड एरिया दलममध्ये पुरवठा टीममध्ये सदस्य पदावर भरती झाला. २०१८ मध्ये त्याची उपकमांडर पदावर बढती झाली. २०१७ मध्ये मिरतूर (जि. बिजापूर, छत्तीसगड) व २०२२ मध्ये तिम्मेनार (जि. बिजापूर, छत्तीसगड) येथे झालेल्या चकमकीत त्याचा सहभाग आढळला होता. त्याच्यावर महाराष्ट्र सरकारने सहा लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. नक्षल्यांचे अस्थिर व गुन्हेगारी क्षेत्र सोडून सामान्य जीवन जगण्यासाठी त्याने २८ मे रोजी सीआरपीएफचे पोलीस उप-महानिरीक्षक जगदीश मीणा यांच्यासमोर आत्मसमर्पण केले . त्यानंतर त्यांनी त्यास हस्तांतरण गडचिरोली पोलिस दलाकडे सुपूर्द केले. आत्मसमर्पण केल्याने त्यास केंद्र व राज्य सरकारकडून
त्यास पाच लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.
आतापर्यंत १४ जहाल माओवाद्यांचे आत्मसमर्पण
माओवादविरोधी अभियानामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची संधी उपलब्ध करून दिल्याने २०२२ ते २०२४ या कालावधीत आतापर्यंत एकूण १४ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. विकासकामांना आडकाठी निर्माण करणाया माओवाद्यांवर कारवाई करण्यास पोलिस दल तत्पर असून, माओवाद्यांना सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलिस दल सर्वतोपरी मदत करत आहे. त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन त्यांनी केले.