बहुचर्चित रणजित सिंह हत्या प्रकरणात पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने राम रहीमला मोठा दिलासा दिला आहे. कोर्टाने राम रहीमची निर्दोष मुक्तता केला आहे. सिरसा कॅम्पचे व्यवस्थापक रणजित सिंग यांची १० जुलै २००२ रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात सीबीआय कोर्टाने राम रहीमला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
राम रहीमने जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. मंगळवारी त्यांच्या अपिलावर निर्णय देताना उच्च न्यायालयाने सीबीआय न्यायालयाचा निर्णय रद्द केला आहे. राम रहीम याच्यासह इतर ५ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. याप्रकरणी सविस्तर आदेश येणे बाकी आहे.
राम रहीम सध्या तुरुंगात असून पत्रकार हत्या आणि साध्वी बलात्कार प्रकरणात कोर्टाने त्याला दोषी ठरवलं आहे. याशिवाय राम रहीमवर सिरसा कॅम्पचे व्यवस्थापक रणजित सिंग यांची हत्या केल्याचा आरोप आहे. याच आरोपाखाली सीबीआयने राम रहीम याच्याविरोधात खटला दाखल केला होता.
सुरुवातीला या प्रकरणात राम रहीमचे नाव नव्हते. मात्र, पोलीस तपासावर असमाधानी असणाऱ्या रणजित सिंग यांचा मुलगा जगसीर सिंग याने जानेवारी २००३ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सीबीआय तपासाची मागणी केली होती. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले.
ऑक्टोबर २०२१ मध्ये डेरा मुखीसह पाच आरोपींना दोषी ठरवण्यात आले. कोर्टाने राम रहीमला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. याशिवाय साध्वी लैंगिक शोषण प्रकरणातही राम रहीम सिंगला २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. सीबीआय कोर्टाच्या या निर्णयाविरोधात राम रहीमने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.मंगळवारी न्यायालयाने राम रहीमच्या अपिलावर अंतिम सुनावणी घेतली. सबळ पुरावे नसल्याने उच्च न्यायालयाने सीबीआय न्यायालयाचा निर्णय रद्द केला आहे. सध्या राम रहीम रोहतकच्या सुनारिया तुरुंगात आहे. अनेक वेळा तो जामीनावर बाहेरही आला होता. यावरून सरकारवर बरीच टीका झाली होती.