Advertisement

तब्बल ७९ दिवसांनी होणार विठुरायाचे चरणस्पर्श

प्रजापत्र | Monday, 27/05/2024
बातमी शेअर करा

 तब्बल ७९ दिवसानंतर पुन्हा एकदा विठुरायाच्या पायावरील दर्शनास 2 जूनपासून सुरुवात होणार आहे. दरम्यान, विठुरायाच्या पूजेला पालकमंत्री उपस्थित राहणार आहेत. मात्र, आचारसंहिता असल्याने पालकमंत्री उपस्थित राहणार असूनही देवाची पूजा मंदिराच्या पुजाऱ्यांच्या हस्तेच केली जाणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. मंदिर संवर्धन कामामुळे १५ मार्च पासून देवाच्या पायावरील दर्शन बंद करून केवळ पहाटे सहा ते सकाळी अकरा इतकाच वेळ भाविकांना मुखदर्शन व्यवस्था ठेवली होती. आता गाभारा चौखांबी आणि सोळखांबी येथील कामे पूर्ण होत आल्याने आता भाविकांना २ जूनपासून थेट पायावर दर्शन करता येणार आहे . यासाठी मंदिर समितीने सर्व व्यवस्था पूर्ण केली असून २ जूनच्या या सोहळ्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील , मंदिर समिती सदस्य , मंदिर सल्लागार समिती सदस्य , जिल्हाधिकारी आणि सर्व प्रमुख फडकर्यांना निमंत्रित केले आहे. 

 

 

 

गाभारा , चौखांबी , सोळखांबी, बाजीराव पडसाळी भागाची कामे पूर्ण झाली
सध्या आचारसंहिता सुरु असल्याने जरी पालकमंत्री अथवा मंदिर समिती अध्यक्ष उपस्थित असले तरी विठूरायाची सकाळची नित्यपूजा मंदिर समितीच्या पुजार्यांच्याच हस्ते केली जाणार आहे. ही पूजा सुरु असताना पालकमंत्र्यांसह सर्व मान्यवर हे समोर बसून राहणार आहेत. आता विठ्ठल सभामंडपाचे काम सुरु असून हे पूर्ण होण्यास ३० जून उजाडणार असल्याने आता देवाच्या मुखदर्शनाच्या व्यवस्था पर्यायी मार्गाने करण्याचे नियोजन समितीने केले आहे. विठ्ठल मंदिराला ७०० वर्षापूर्वीचे रूप देण्याचे सुरु असलेल्या कामांपैकी गाभारा , चौखांबी , सोळखांबी, बाजीराव पडसाळी वगैरे भागाची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे 2 जून पासून भाविकांना विठुरायाचे मूळ दगडी गाभाऱ्यात तर दर्शन घेता येणारच आहे. शिवाय  विठ्ठल मंदिराचे ७०० वर्षापूर्वीचे हे पुरातन रूप देखील पाहता येणार आहे. 

 

१५ मार्चपासून विठ्ठलाचं चरणस्पर्श दर्शन होते बंद
विठ्ठलाचं चरणस्पर्श  दर्शन १५ मार्चपासून  दीड महिन्यांसाठी बंद होते  विठ्ठलाच्या मंदिर गाभाऱ्याचं काम करण्यासाठी मंदिर प्रशासनाने हा निर्णय होता. या काळात रोज सकाळी ५ ते ११ वाजेपर्यंत फक्त  मुखदर्शन सुरू राहणार आहे.  यामुळे १५ मार्चपासून देवाचे पायवरील दर्शन पुढील किमान दीड महिन्यासाठी पूर्णपणे बंद करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले होते. दरम्यान आता पुन्हा एकदा विठ्ठलाचे दर्शन सुरु होणार असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 

Advertisement

Advertisement