बीड- राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल आज २७ मे रोजी दुपारी १ वाजता बोर्डाने ऑनलाईन जाहीर केला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वप्रथम येण्याचा मान यंदाही बीड जिल्ह्याने पटकावला आहे. बीड जिल्ह्याचा विभागामध्ये सर्वाधिक ९७.४० टक्के निकाल लागला आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्हा दुसऱ्या स्थानी असून जालना तिसऱ्या तर परभणी जिल्हा तिसऱ्या स्थानी असल्याचे बोर्डाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर झालेल्या निकालामध्ये बीड जिल्ह्याचा सर्वाधिक ९७.४० टक्के निकाल लागला असून छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचा ९५. ५१ टक्के इतका निकाल लागला आहे जालना ९४.९९ टक्के परभणी ९३.०३ टक्के आणि हिंगोली जिल्ह्याचा ९२.५२ टक्के इतका निकाल लागला आहे.
मार्च 2024 मध्ये इयत्ता दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी बीड जिल्ह्यातून २३ हजार ९७४ मुले तर १८ हजार मुली असे एकूण ४१ हजार ९८३ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले होते. यापैकी २३ हजार ७६५ मुले व १७ हजार ८०६ मुली अशा एकूण ४१ हजार ५७१ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. या परीक्षेचा आज निकाल जाहीर झाल्यानंतर २३ हजार ११ मुले उत्तीर्ण झाले असून १७ हजार ४८३ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. दहावीच्या परीक्षेत एकूण ४० हजार ४९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या सर्वांचा एकत्रित निकाल ९७. ४० टक्के इतका लागला आहे.