Advertisement

ठपका हटविण्यासाठी मागितली लाच

प्रजापत्र | Friday, 24/05/2024
बातमी शेअर करा

बीड-मागच्या १० दिवसांपासून जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाया चर्चेत असताना आता शुक्रवारी (दि.२४) आणखी एका कर्मचाऱ्याला ३० हजारांची लाच घेताना पकडले आहे.एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यावर ही कारवाई आज करण्यात आली.त्यामुळे जिल्ह्यातील लाचखोरांची चर्चा आता पुन्हा एकदा यानिमित्ताने होत आहे. 
             मागच्या एक ते दीड आठवड्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्ह्यात अनेक मोठे मासे गळाला लावले होते.विशेष करून पोलीस दलातील अधिकारी लाचेत अडकल्यानंतर क्लास वन ऑफिसर ही लाच घेताना पकडले.त्यामुळे एसीबीच्या कारवाया जिल्ह्यात चर्चेत होत्या.या दरम्यानच तक्रारदाराने बीडच्या एसीबीकडे  एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकारी असलेल्या दिनेश राठोडबाबत तक्रार दिली होती.तक्रारदाराला अंबाजोगाई,परळी येथे  नियुक्ती हवी होती.मात्र त्या ठिकाणी त्याला नियुक्ती न देता माजलगावला पाठविण्यात आले होते.त्यामुळे तक्रारदार माजलगावला रुजू झाला नव्हता.१ महिन्यांचा कालावधी झाल्यानंतर त्याच्यावर ठपका ठेवण्यात आला होता.यात नंतर सहकार्य करण्यासाठी  राज्य परिवहन महामंडळाच्या बीडमधील कामगार अधिकरी दिनेश राठोडने ३० हजारांची लाच मागितली होती.ही लाच स्विकारताना एसीबीने रंगेहात पडकले आहे.दरम्यान जिल्हयात सुरु असलेल्या लाचखोरीचे वाढते प्रमाण यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर येत आहे. 

 

धाराशिवच्या टीमने केली कारवाई 
मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराने बीडच्या एसीबीकडे धाव घेऊन तक्रार दिली होती.मात्र मागच्या काही दिवसांत बीडमधील मोठे अधिकारी गळाला लावण्याचे काम सुरु असल्याने ही तक्रार धाराशिवच्या अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आली.त्यामुळे धाराशिवचे पथक बीडमध्ये आले आणि त्यांनी ही कारवाई केल्याचे कळते.यासाठी बीडच्या एसीबीने त्यांना मदत केली होती.  

 

Advertisement

Advertisement