Advertisement

थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या

प्रजापत्र | Friday, 24/05/2024
बातमी शेअर करा

पुणे-  पुण्यातील कल्याणीनगर इथं झालेल्या अपघाताचे मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणावरही पडसाद उमटत आहेत. अपघात प्रकरणातील आरोपीला वाचवण्यासाठी स्थानिक आमदार आणि पोलीस प्रशासनाने प्रयत्न केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात येत आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं स्पष्ट केल्यानंतरही सरकावर होणारी टीका थांबली नसून आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी फडणवीस यांच्यासह राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही जोरदार निशाणा साधला आहे.

 

 

 

रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट लिहीत म्हटलं आहे की, "देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही म्हणाला होतात की, गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील. गृहमंत्री महोदय…. गाडीखाली कुत्रं नाही तर जीवंत माणसं चिरडली जात आहेत. रस्त्याने चालणारा सामान्य माणूस सुरक्षित नाही. भर दिवसा इंदापूर तहसीलदारावर हल्ला झाल्याने अधिकारीही सुरक्षित नाही. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नाही आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांचा पत्ता नाही. कुठंय तुमचं कायद्याचं राज्य? आपण नेहमी नैतिकतेचे कांदे सोलता… आता थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या," अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

दरम्यान, पुण्यातील अपघात प्रकरणाची राज्यभरात चर्चा होत असताना पुण्याचे पालकमंत्री असणारे अजित पवार हे मात्र गायब असल्याने तर्क- वितर्क लावले जात होते. त्यातच आता रोहित पवार यांनी फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी करताना अजित पवार यांनाही लक्ष्य केल्याचं दिसत आहे.

 

Advertisement

Advertisement