Advertisement

बहिणीच्या लग्नाला चार तास बाकी असताना भावाचा अपघाती मृत्यु

प्रजापत्र | Saturday, 09/01/2021
बातमी शेअर करा

धारूर :परळी-बीड मार्गवरील तपोवन पाटीजवळील पेट्रोल पंपाजवळ दुचाकी आणि टॅक्टरच्या अपघातात एका 23 वर्षीय तरुणाचा शनिवारी सकाळी 9 वाजता मृत्यु झाला आहे. दुःखद बाब म्हणजे बहिणीच्या लग्नानिमित्त फटके आणण्यासाठी गेलेल्या भावावर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बहिणीच्या लग्नाला अवघे चार तास बाकी असताना ही हृदयद्रवक घटना घडली.

सचिन शिवाजी चव्हाण (वय २३, रा. शेरी तांडा, ता. धारूर) असे अपघातातील मृत तरुणाचे नाव आहे. शनिवारी दुपारी १ वाजता सचिनची बहिण अंजली हिचा विवाह होता. लग्ना लागताच वाजविण्यासाठी तोफा नसल्याचे सचिनच्या ऐनवेळी लक्षात आले. त्यामुळे तो चुलत भाऊ नितीन आप्पासाहेब चव्हाण (वय २२) याला सोबत घेऊन दुचाकीवरून (एमएच २० एफ ६८९५) सिरसाळा येथून फटाके आणण्यासाठी निघाले. वाटेत परळी-बीड रोडवरील तपोवन पाटीजवळील पेट्रोल पंपातून डीझेल भरून बाहेर पडत असलेल्या रिकाम्या ट्रॅक्टरसोबत त्यांच्या दुचाकीची धडक झाली. या अपघातात सचिनचा जागीच मृत्यू झाला तर नितीन हा गंभीर जखमी झाला जखमी नितीनवर लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर तांड्यावरील विवाह सोहळा साध्या पद्धतीने उरकण्यात आला. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता सचिनच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

एकुलता एक गुणवंत मुलगा गेला 
सचिनचे वडील शिवाजी चव्हाण हे औरंगाबादला शिक्षक आहेत. त्यांना तीन मुली आणि सचिन हा एकुलता एक मुलगा होता. हे सर्व कुटुंब औरंगाबादला राहत होते. लॉकडाऊनच्या काळात ते गावाकडे तांड्यावर आले होते. नुकताच सचिनचा बी.ए.एम.एस साठी प्रथम यादीत क्रमांक लागला होता असे नातेवाईकांनी सांगितले. एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने चव्हाण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Advertisement

Advertisement