Advertisement

स्वस्तात सोन्याचे बिस्कीट देतो असे म्हणत शेतकऱ्याला फसवले

प्रजापत्र | Friday, 24/05/2024
बातमी शेअर करा

 केज   - एका भामट्याने स्वस्तात सोन्याचे बिस्कीट देतो असे म्हणत एका ६५ वर्षीय शेतकऱ्याच्या हाताच्या बोटातील सोन्याची अंगठी काढून घेऊन त्यांना पितळी चौकोनी बिस्कीट देवून फसवणूक केल्याचा प्रकार केज शहरात घडला. याप्रकरणी अनोळखी दोघा भामट्याविरुद्ध केज पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. 

 

 

 

 

 

      कोल्हेवाडी (ता. केज) येथील शेतकरी किसन बाजीराव मिसाळ (वय ६५) हे २२ मे रोजी लातूर येथील मुलाला भेटून गावाकडे परत निघाले होते. दुपारी १२ वाजेच्या दरम्यान केज शहरातील वसुंधरा बँकेसमोरून बसस्थानकाकडे जात असताना एक अनोळखी इसमाने त्यांच्या हातातील बटवा खाली पडल्याच्या बहाणा करीत त्यांच्याशी लगट केली. तेवढ्यात त्या अनोळखी इसमाने त्याच्या स्वतःच्या गळ्यातील लॉकेट व अंगठी काढून दुसऱ्या एका व्यक्तीला देत त्या बदल्यात एक सोन्याच्या बिस्कीटासारखा दिसत असलेला पितळी सदृश्य धातूचा चौकोनी आकाराचा लाल कागदात गुंडाळलेला तुकडा दिला. त्या अनोळखी इसमाने किसन बाजीराव मिसाळ यांनाही स्वस्तात सोने घेण्याचा आग्रह केला. त्यावेळी किसन मिसाळ यांनी माझ्याकडे पैसे नाहीत म्हणताच त्या अनोळखी इसमाचे लक्ष त्यांच्या हातातील अंगठीकडे गेले. त्याने नगदी पैशाऐवजी अंगठीची मागणी केली. त्यानंतर किसन मिसाळ यांच्या हातातील सोन्याची काढून घेऊन त्या बदल्यात सोन्याचे बिस्कीट म्हणून अंदाजे २०० ग्रॅम वजनाचे पितळ सदृश्य धातूचा पिवळ्या रंगाचा चौकोनी तुकडा एका लाल रंगाच्या कागदात गुंडाळून त्यावर पुन्हा एका लक्की ड्रॉच्या जाहिरातीचा कागद गुंडाळून त्यांच्या हवाली केला. ते निघून गेल्यानंतर त्यांना एवढ्या स्वस्तात २०० ग्रॅमचे सोन्याचे बिस्कीट कसे काय दिले असेल ? असा संशय त्यांना आल्याने त्यांनी पुडी उघडून पाहिली. त्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.  खात्री पटल्यानंतर किसन मिसाळ यांनी २३ मे रोजी पोलीस ठाणे गाठले. त्यांनी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांची भेट घेवून घडलेल्या प्रकारची माहिती दिली. प्राथमिक चौकशी करून त्यांची फिर्याद नोंदवून घेण्यात आली. किसन मिसाळ यांच्या तक्रारीवरून अनोळखी दोघा भामट्याविरुद्ध केज पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनात पोलिस नाईक त्रिंबक सोपणे हे पुढील तपास करीत आहेत. 

Advertisement

Advertisement