बीड दि.२२ (प्रतिनिधी)-अधिकाऱ्यांच्या वाढत्या लाचखोरीमुळे जिल्हा बदनाम होत असून प्रत्येक प्रकरणात लाच मागण्याचा सुरु असलेल्या पायंड्यामुळे जिल्ह्याची मोठी बदनामी होत असल्याचे चित्र आहे.मागच्या आठवड्यातच पोलीस दलात सुरु असलेल्या लाचखोरीमुळे राज्यात खळबळ उडाली असताना आता आणखीन चार लाचखोरांवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाया सध्या जिल्ह्यात चर्चेच्या विषय ठरत आहेत.बुधवारी कार्यकारी अभियंत्यांसह दोन खासगी अभियंत्यांना एसीबीने पकडले असून नगररचनाकार फरार झाला आहे.
प्रशांत शिवाजी डोंगरे (वय २९ रा. चऱ्हाटा फाटा, बीड) हा सहायक नगर रचनाकार असून त्याच्याकडे सध्या नगररचनाकार या पदाचा अतिरिक्त पदभार होता. तसेच निलेश सोपान पवार (वय २९, रा. आंतरवली बुद्रुक ता. गेवराई) हा अभियंत्याचा मदतनीस असून शेख नेहाल शेख अब्दुल गणी (वय ३०्र रा.शहेंशाह नगर, बीड) हा अभियंता आहे. तक्रारदाराचे येळंबघाट शिवारातील गट क्रमांक ५८० अ (१) मधील २०.५० आर क्षेत्राचा अकृषिक परवाना काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज बीपीएमएस पोर्टलवर निलेश पवार याच्या मार्फत दाखल केला होता.
बीडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी पुढील कारवाईसाठी तो नगर रचना कार्यालयात पाठविला. २६ मार्च निलेश याने प्रशांत डोंगरे याच्यासाठी ३० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. २ एप्रिल रोजी याची पंचासमक्ष खात्री करण्यात आली. त्यानंतर ४ एप्रिल रोजी डोंगरेने देखील लाच मागितल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर तडजोडीअंती १५ हजार रूपयांची लाच शेख नेहाल याच्याकडे देण्यास सांगितली. याप्रकरणी निलेश पवार व नेहाल शेख यांना ताब्यात घेतले. तर डोंगरे हा फरार आहे. या तिघांविरोधातही बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू हाेती.
तर राजेश आनंदराव सलगरकर (कार्यकारी अभियंता,माजलगाव पाटबंधारे विभाग) याला ही २८ हजारांची लाच घेताना पकडले आहे. तक्रारदार व साक्षीदार आणि गावातील इतर पाच शेतकरी यांचे मौजे चिंचोटी तलावातील बुडीत क्षेत्रातील गाळ व माती काढून शेतात टाकण्यासाठी परवानगी मिळण्यासाठी कार्यकारी अभियंता पाठबंधारे विभाग येथे अर्ज दिला होता. सदर अर्जावरून मौजे चिंचोटी तलावातील बुडीत क्षेत्रातील गाळ व माती काढून शेतात टाकण्यासाठी परवानगी देण्यासाठी प्रत्येकी ५ हजार प्रमाणे सात जणांचे ३५ हजारांची मागणी करून तडजोड अंती प्रत्येकी ४ हजार प्रमाणे प्रत्येकी ७ जणांकडून २८ हजारांची मागणी करून सलगरकर याला सदर लाच घेताना रंगेहात पकडले आहे. दरम्यान चार लाचखोरांवर गुन्हा दाखल होत असल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सदर कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक मुकूंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक शंकर शिंदे, हनुमान गोरे, संतोष राठोड, स्नेहलकुमार कोरडे, गणेश मेहेत्रे आदींनी केली.

बातमी शेअर करा