बीड दि.१९ (प्रतिनिधी)-चार दिवसांपूर्वी जिजाऊ प्रकरणात आरोपी न करण्यासाठी १ कोटीच्या लाच प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली असताना आता ठेवीदार संघर्ष कृती समितीने पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर आणि आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडेवर गंभीर आरोप केले आहेत.एसपी आणि खाडे यांनी ठेवीदारांचा विश्वासघात केला असून जिजाऊ मल्टीस्टेट प्रकरणी कलम १७३(८) नुसार फेर चौकशीची मागणी करण्यात आली आहे.ठेवीदारांच्या विश्वासाला पोलिसांच्या वागण्यामुळे तडा गेल्याचे मारुती तिपाले,शेख कुतुब यांनी म्हटले आहे.
बीडमध्ये जिजाऊ मल्टीस्टेटमुळे हजारो ठेवीदार अडचणीत आले आहेत. अनेकांचे संसार उघड्यावर आले असून कोट्यवधी रुपये घेऊन बबन शिंदे फरार झाला आहे.याप्रकरणात पोलिसांनी बबन शिंदेंवर कठोर कारवाई करण्याऐवजी त्याला सहकार्य केल्याचा आरोप ही प्रसिद्धी पत्रकात केला आहे.पैशाचे लालच पाहून खाडे यांनी आपली नियत बदलली,त्यामुळे ते कर्तव्य विसरून गेल्याचे तिपाले आणि शेख यांनी म्हटले आहे.तसेच जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेट प्रकरणी गुन्हा नोंद होवून आता दहा महिने उलटले आहेत.आजपर्यंत फक्त अध्यक्षा अनिता शिंदे यांना अटक झाली असून मुख्य आरोपी बबन शिंदे अद्याप फरार आहे. तर राज्य सहकर आयुक्तांनी ७३.४६ कोटीचा गैरव्यवहार मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक मंडळांनी केला असल्याचा लेखी अहवाल मुख्य रजिस्टर भारत सरकार यांच्याकडे पाठवला. परंतु त्यांनाही अंतरीम जामीन मिळाला. गंभीर ठपका असुन ही त्यांचा जामीन पोलीसांना रोखता आला नाही.
एमपीआयडी १९९९ कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद असून तयार केलेला प्रस्ताव अपूर्ण आहे. तसेच मुख्य आरोप बबन शिंदे,अनिता शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी वांढरे, संचालक, नातलग यांच्या जिल्हा बाहेरील संपत्तीचा तपास अपुरा आहे.आरोपींच्या कोणत्याही मालमत्तेला टाच आलेली नाही. दरम्यान ठेवीदारांनी पोटतिडकीने अनेकदा सर्व बाबी पोलिस अधीक्षक व तपास अधिकारी खाडे यांच्या समोर मांडल्या. मात्र त्याची दखल घेण्यात आली नसल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे.
एसआयटी तपासाचे काय झाले?
पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर आणि आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांनी जिजाऊ प्रकरणात घेतलेली संपूर्ण भूमिकाच संशयास्पद आहे. ठेवीदारांनी पाठपुरावा करून एसआयटी चौकशीची मागणी केली होती.त्यानुसार याप्रकरणात एसआयटीची नेमणूक झाली मात्र या पथकात पुन्हा खाडेचा समावेश कायम राहिला.त्यामुळे एसआयटी यात नव्याने काहीच केले नाही.ठेवीदारांनी एसआयटी प्रमुख विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर यांना यापूर्वीच २७ मुद्द्यांचे निवेदन पाठवलं आहे,याचीही दखल घेतली गेली नाही. अगदी सुरुवातीपासून खाडे आरोपींच्या संपर्कात होते. या बॅंकेत तुम्ही पैसे का ठेवले?कायदेशीर कार्यवाही करण्याऐवजी ठेवीदारांना निराशजनक बोलले.तुम्हाला पैसे हवेत की आरोपी पाहिजेत असा सल्ला देऊन ठेवीदारांना संभ्रमित केले.दहा दहा रुपये जमा करून ठेवीदार बांधव जिल्हा व उच्च न्यायालयात लढा देत असताना ज्यांच्यावर शासनाने तपासाची न्यायाची जबाबदारी दिली त्यांनीच स्वार्थ हेतूने ठेविदारांचा विश्वासघात केला.त्यांना न्यायापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवले.अजूनही वेळ गेलेली नाही. गरीब ठेविदारांच्या हितासाठी ठोस कारवाई करावी. संतप्त ठेवीदार अन्याय सहन करणार नाही. न्यायालयात व रस्त्यावर उतरून पुन्हा संघर्ष करेल असे प्रसिद्धीपत्रकात ठेवीदार संघर्ष कृती समितीच्या वतीने म्हटले आहे.
तर मुख्य आरोपीकडून किती उकळले...
आर्थिक गुन्हे शाखेचा लाचखोर हरिभाऊ खाडेंनी घोटाळ्याशी सुतराम संबंध नसणाऱ्या आकाश गायकवाडकडे एक कोटीची मागणी केली.तर मग दोनशे कोटीचा घोटाळा करणारा मुख्य सुत्रधार आरोपी बबन शिंदे यांच्याकडून किती कोटी घेतले असतील? बरं ही रक्कम फक्त खाडेच्या खिशात गेली की अजून कोणत्या अधिकाऱ्याकडे पोहोचली याची चौकशी होण्यासाठी ठेवीदार संघर्ष कृती समिती गृहमंत्र्यांना साकडे घालणार असून प्रसंगी उपोषणाल बसणार आहे.