Advertisement

आजही राज्यात वीज वारा गारांसह पाऊस पडणार

प्रजापत्र | Wednesday, 15/05/2024
बातमी शेअर करा

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. अनेक ठिकाणी या पावसाचा फटका नागरिकांना बसलाय. कारण पावसाबरोबच अनेक ठिकाणी वादळी वारा देखील झालाय. यामुळं शेती पिकांचं  नुकसान झालंय. तसेच अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना देखील घडल्या आहेत. दरम्यान, आज हवामान  नेमकं कसं राहणार? याबाबत हवामान विभागानं माहिती दिलीय. 

 

 

येत्या २४ तासात 'या' भागात अवकाळी पावसाचा इशारा 
आजही राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. गेल्या अनेक काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात पाऊस पडत आहे. वादळी वाऱ्यांसह तर काही ठिकाणी गारपीट देखील होत आहे. दरम्यान  येत्या २४ तासात राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह अनेक जिल्ह्यांत पावसाची शक्याता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्याचबरोबर, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात देखील वादळी वाऱ्यासह पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तसेच जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

 

 

अवकाळी पावसाचा शेती पिकांना फटका
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस कोसळत आहे. या पावसाचा शेती पिकांना देखील मोठा फटका बसलाय. फळबागांसह भाजीपाला पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. अवकाळी पावसामुळं नांदेड, बारामती आणि नाशिकच्या सुरगाण्यात पिकांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. तिथं अवकाळीमुळे ज्वारी, केळी, आंब्याचं मोठं नुकसान झालं आहे. 

 

 

आणखी किती दिवस अवकाळी पावसाचा जोर राहणार?
दरम्यान, राज्यात आणखी किती दिवस या अवकाळी पावसाचा जोर राहणार? याबाबतचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर याबाबात हवामान अभ्यासक माणिकराव खुळे  यांनी माहिती दिली आहे. माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितनुसार येत्या 19 मे पर्यंत अवकाळी पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. सध्या राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण कायम आहे. ही स्थिती 19 मे पर्यंत कायम राहील. 19 मे पासून राज्यात अवकाळी पावसाचा जोर कमी होणार असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. दरम्यान, या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

 

Advertisement

Advertisement