मुंबई- घाटकोपर येथे सोमवारी (दि. १३) संध्याकाळी होर्डिंग्ज पडून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी संबंधित स्थानिक प्रशासनातील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. घाटकोपर होर्डिंग्ज दुर्घटनास्थळी दानवे यांनी आज (दि. १४) प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते.
घाटकोपर होर्डिंग्ज दुर्घटनास्थळी भेट दिल्यावर अंबादास दानवे यांनी दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्णांची राजावाडी रुग्णालयात भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच रुग्णांवर योग्य ते उपचार होत आहेत की नाही याबाबत रुग्णालय प्रशासनाकडून माहिती घेतली.सरकारने २०२२ ला होर्डिंग्ज धोरण आणले मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दानवे यांनी म्हटले. अशा दुर्घटना टाळण्यासाठी होर्डिंग्ज धोरणात नियमावली बनविण्यात आली असल्यामुळे या होर्डिंग्ज धोरणाची कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे असे दानवे म्हणाले.
तसेच या घटनेला जबाबदार असलेल्या स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. तसेच या घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून यातील मृत, जखमी तसेच ज्यांच्या गाड्यांचे नुकसान झाले या सर्वांना नुकसान भरपाई दिली पाहिजे. होर्डिंग्ज धोरणानुसार राज्यातील सर्व होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, अशी मागणीही दानवे यांनी केली.