बीड - लोकसभा निवडणूकीचे मतदान करण्यासाठी मतदारांमध्ये प्रचंड उत्साह असल्याचे दिसत आहे. दुपारच्या भर उन्हातही मतदार घराबाहेर पडून मतदान केंद्रावर रांगा लावत होते. दुपारी १ वाजेपर्यंत जिल्ह्यात ३३.६६ टक्के मतदान झाले होते.
मतदानाचा हा टक्का वाढेल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. जिल्ह्यात २३५५ मतदान केंद्रांवर मतदान होत असून मतदारांची संख्या २१ लाख ४२ हजार एवढी आहे. सोमवारी सकाळी ७ वाजेपासूनच मतदानाला सुरूवात झाली. धारूरमध्ये ईव्हीमएचा थोडा अडथळा आला होता, परंतू तो लगेच दुर झाला. केज तालुक्यातील कोरडेवाडी येथील ग्रामस्थांनी पाण्याच्या प्रश्नासाठी मतदानावर बहिष्कार टाकला होता. २१०० मतदार असूनही येथे एकही मतदान झाले नव्हते. माजलगाव तालुक्यातही दुकानांची तोडफोड झाली.
कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलिस महानिरीक्षक विरेंद्र शर्मा यांनी विविध मतदान केंद्रांना भेटी देत आढावा घेतला. तसेच जिल्हाधिकारी दीपा मुधोळ, जिल्हा पाेलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी आपला हक्क बजावून मतदान केंद्रांना भेटी दिली.