Advertisement

काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी विलीन होणार का?

प्रजापत्र | Wednesday, 08/05/2024
बातमी शेअर करा

लोकसभा निवडणुकीची धामधुमी सुरू असताना राष्ट्र्वादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. येत्या काळात प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असं शरद पवार म्हणाले आहेत.

 

 

“पुढील दोन वर्षांत अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी अधिक जवळीक साधतील. किंवा काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय त्यांच्या पक्षासाठी सर्वोत्तम आहे असे त्यांना वाटत असेल”, असं शरद पवार म्हणाले. तसंच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही काँग्रेसमध्ये विलीन होणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “मला काँग्रेस आणि आमच्यात काही फरक दिसत नाही. वैचारिकदृष्ट्या, आम्ही गांधी, नेहरू विचारसरणीचे आहोत. मी आता काहीही बोलत नाही. सहकाऱ्यांचा सल्ला घेतल्याशिवाय मी काहीही बोलणार नाही. वैचारिकदृष्ट्या, आम्ही त्यांच्या (काँग्रेसच्या) जवळ आहोत. पक्षाबाबतचे पुढील सर्व निर्णय सामूहिकपणे घेतले जातील.

 

 

उद्धव ठाकरेंची विचारसरणी आमच्यासारखीच
मित्रपक्ष शिवसेना ठाकरे गटाबद्दल बोलताना पवार म्हणाले, “उद्धव ठाकरे देखील समविचारी पक्षांबरोबर एकत्र काम करण्याबद्दल सकारात्मक आहेत. मी त्यांची विचारसरणी पाहिली आहे, ती आमच्यासारखीच आहे.
“राजकीय पक्षांच्या एका मोठ्या वर्गाला भाजप आणि (नरेंद्र) मोदी आवडत नाहीत. आणि हे विरोधक एकत्र येऊ लागले आहेत. देश का मूड मोदी के खिलाफ हो रहा है (देशातील मूड नरेंद्र मोदींच्या विरोधात वळत आहे), आणि आम्ही गांधी आणि नेहरूंच्या विचारांना अनुसरून सकारात्मक दिशेने वाटचाल करत आहोत”, असंही शरद पवार म्हणाले.

 

 

गेल्यावेळच्या निवडणुकीपेक्षा यंदाची लढत वेगळी
२०१९ आणि २०२४ च्या निवडणुकीत एक फरक आहे. गेल्यावेळेच्या तुलनेत यंदा तरुण विरोधी पक्षांशी जुळवून घेत आहेत. पवार म्हणाले की, परिस्थिती १९७७ मधील जनता पक्षासारखी होऊ शकते. निवडणुका जाहीर झाल्यानंतर विविध पक्ष एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली होती आणि त्यांनी सरकार स्थापन केले.

तेव्हाही विरोधकांनी निवडणुकीपूर्वी पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता. मोरारजी देसाई यांची नंतर पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली. जयप्रकाश नारायण आणि जे.बी. कृपलानी यांनी जनता पक्ष स्थापन करण्यासाठी विलीन झालेल्या विविध पक्षांच्या खासदारांशी बोलून हा निर्णय घेतला होता.

Advertisement

Advertisement