लोकसभेच्या निवडणूक या देशाचे भवितव्य ठरविणाऱ्या असतात. या निवडणुकांमध्ये म्हणूनच देशासमोरील आव्हाने, सरकारची मागच्या काळातली उपलब्धी आणि देशाच्या विकासाच्या दिशेने असलेली धोरणे यावर चर्चा अपेक्षित असते. मात्र असल्या चर्चा भाजपला कायम अडचणीत आणणाऱ्या ठरतात , म्हणूनच भाजपलोकसभा निवडणूक देखील अस्मितांच्या मुद्द्यांभोवती कशी फिरेल हेच पाहत असतो. मात्र महाराष्ट्रात तरी शरद पवार आणि एकूणच विरोधी पक्षाने भाजपला शेतकरी, महागाई या मुद्द्यांवरून घेरले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणाची नाडी जितकी शरद पवारांना समजलेली आहे तितकी इतर कोणाला क्वचितच समजलेली असेल. कोणत्यावेळी कोणता विषय घेऊन पुढे यावे आणि कधी कोणता मुद्दा निवडणुकीच्या प्रचाराचा करावा , याहीपलीकडे जाऊन कधी कोणते कार्ड खेळावे यात शरद पवार माहीर आहेत. म्हणूनच महाराष्ट्रात भाजपच्या सत्तेच्या मार्गातला सर्वात मोठा अडसर कायम शरद पवार ठरत आले आहेत. त्यासाठीच शरद पवारांना राजकीयदृष्ट्या अडचणीत कसे आणायचे हे भाजपसमोरचे महाराष्ट्रात तरी प्रमुख उद्दिष्ट राहिलेले आहे.
लोकसभेची ही निवडणूक भाजपसाठी भाजप दाखवतोय तितकी सोपी राहिलेली नाही हे तर स्पष्ट आहे. भाजपकडून भलेही 'चारसोपार' च्या गप्पा केल्या जात असतील, मात्र मागच्या म्हणजे २०१९ च्या निवडणुकीत गाठलेली ३०३ ची संख्या तरी भाजपला गाठता येईल का याबद्दल सश्नक्त आहे. देशातील आजच्या घडीचा सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपसमोर आज देखील निवडणुकीला समोर जाण्याचा स्वतःच असा मुद्दा राहिलेला . काँग्रेस किंवा इतर विरोधीपक्षांनी काही मुद्दे काढले तर त्याला प्रत्युत्तर देणारा प्रतिक्रियावादी प्रचार भाजपकडून सुरु आहे. म्हणूनच भाजपला ही निवडणूक केवळ अस्मितांच्या मुद्द्यांभोवतीच फिरवायची आहे.
आज देशासमोर गरिबी, बेरोजगारी, महिलांची सुरक्षितता, ढासळणारी अर्थव्यवस्था असे अनेक प्रश्न आहेत. असंघटित आणि वंचित घटकांचे प्रश्न आहेत. मात्र त्याबद्दल भाजप बोलत नाही. हे मुद्दे निवडणुकीत अंगलट येऊ शकतात याची पूर्ण जाणीव भाजपला आहे. म्हणूनच निवडणुका या मुद्द्यांभोवती जाऊ नयेत असा प्रयत्न भाजपचा राहिलेला आहे. म्हणूनच मग कधी केजरीवाल, कधी मंगळसूत्र तर कधी आणखी काही चर्चेत आणले जात आहे. मात्र महाराष्ट्रात भाजपच्या या मूळ मुद्द्यांपासून भरकटण्याच्या राजकारणाला चाप लावण्याचे काम शरद पवारांनी केले आहे. राज्यातील शेतकऱ्यांची दहा वर्षात झालेली अवस्था, शेती क्षेत्राचे झालेले वाटोळे, शेतमालाच्या कोसळणाऱ्या किमती आणि त्याचवेळी सामान्यांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा असणारा महागाईचा प्रश्न यावर आता शरद पवार आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. शरद पवारांना बारामती मुदतीसंघात अडकवून ठेण्याची खेळी भाजपने खेळली आहे, मात्र शरद पवार त्यालाही बांधलेले नाहीत. ग्रामीण महाराष्ट्रात शेती, शेतकरी आणि शहरी महाराष्ट्रात बेरोजगार यरुन हे प्रमुख मुद्दे आहेत हे शरद पवारांनी ओळखले आहे. सामाजिक आरक्षणाच्या जोडीलाच शेतकरी आणि तरुणांचे प्रश्न घेऊन भाजपचा खरा चेहरा उघड करता येऊ शकतो, सरकारचे नाकर्तेपण जनतेच्या समोर आणता येऊ शकते हे शरद पवारांनी ओळखले आहे आणि म्हणूनच आता महाराष्ट्रात तरी शरद पवार आणि विरोधी पक्षांचा प्रचार त्याच दिशेने सुरु आहे. भाजपसाठी विरोधीपक्षांची ही रणनीती डोकेदुखी वाढविणारी आहे. कारण मागच्या काळात सरकारी नोकर भरतीच्या गोंधळामुळे तरुणाई अस्वस्थ आहे. सोयाबीन , कापूस, धान आदींचे भाव कोसळल्यामुळे शेतकरी परेशान आहे आणि आता शरद पवार त्यालाच हात घालीत आहेत.