भंडारा दि.९ -जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत 10 बाळांना मृत्यू झाला आहे. मध्यरात्री 2च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. धुरामुळे गुदमरुन या बाळांना मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे.
शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात धूर निघत असल्याचं पाहायला मिळालं. तेव्हा कामावर असलेल्या स्टाफने दार उघडून पाहिलं असता आतमध्ये मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचं तिच्या लक्षात आलं. तेव्हा याची माहिती तातडीने वरिष्ठांना देण्यात आली. सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे 7 बाळांचा जीव वाचवण्यात यश आलं आहे.
अग्निशमन दलाला आगीची माहिती देण्यात आल्यानंतर तातडीने मदतकार्य सुरु करण्यात आलं. रुग्णालयातील लोकांनीही यावेळी मदतकार्यात सहकार्य केलं. दरम्यान, शिशु केअर विभागातील मॉनिटर असलेले 7 बालकांना वाचवण्यात यश आलं असलं तरी आऊट बॉर्न विभागातील 10 बाळांचा मात्र मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.