Advertisement

 महाराष्ट्राचा शेतकरी वेगळा अन् गुजरातचा वेगळा आहे का?

प्रजापत्र | Saturday, 27/04/2024
बातमी शेअर करा

देशभरात कांदा निर्यात बंदी असतानाच केंद्रानं गुजरातमधून तब्बल २ हजार मेट्रीक टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला मंजूर दिलीय. त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी चांगलेच आक्रमक झाले असून शेतकऱ्यांकडून या निर्णया विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे विरोधकांनीही सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. अशातच आता प्रहारचे सर्वेसर्वा आणि आमदार बच्चू कडू यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत हा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असल्याची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 

 

 

महाराष्ट्रचा शेतकरी वेगळा अन् गुजरातचा वेगळाय का? 
यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, केंद्र सरकारकडून नवीन जातीवाद निर्माण केल्या जात आहे. गुजरातचा शेतकरी वेगळा आणि महाराष्ट्राचा शेतकरी वेगळा. अशी दुर्दैवी भूमिका केंद्र सरकार घेत असल्याने, शेतकऱ्यांनी याचा विचार करण्याची आवश्यकता असल्याचे बच्चू कडू म्हणाले. जर निर्यात करायची असेल तर सगळ्याच भागातील निर्यातीला केंद्राने परवानगी दिली पाहीजे. हा निर्णय देशभरातील शेतकऱ्यांवर अन्याय करणार आहे. तसेच केंद्र सरकार दुटप्पी भूमिका घेतांना दिसत आहे. त्यामुळे यावर वेळीच निर्णय मागे घेणे अपेक्षित आहे. अन्यथा वेळ पडली तर आम्ही त्यासाठी मोठे आंदोलन करून रस्त्यावर उतरू, असा इशाराही आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे.

 

 

माझ्यासाठी प्रथमस्थानी शेतकरी- बच्चू कडू
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमान शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांना आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने जाहीर पाठिंबा दिलाय. तर येत्या २ किंवा ३ मे रोजी बच्चू कडू राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी मतदारसंघात जाणार असल्याची माहितीही स्वतः बच्चू कडू यांनी एबीपी माझाला दिलीय. बच्चू कडू म्हणाले की, राजू शेट्टी हे शेतकरी नेते आहेत. मी त्यांना पाठिंबा दिला असून त्यांच्या दोन तीन सभेला देखील जाणार आहे. असे असताना, मी जेव्हा पाठिंबा जाहीर केला त्यावेळी मला राज्यातील काही मराठा नेत्यांचे फोन आले. या लोकसभेत दोन मराठा नेते उभे आहे. त्यामुळे तुम्ही स्वत: मराठा असूनही राजू शेट्टीना पाठिंबा का देताय, अशी विचारणा त्यांनी केली. मात्र, मी त्यांना सांगितले की माझ्यासाठी प्रथमस्थानी शेतकरी आहेत आणि राजू शेट्टी शेतकऱ्यांसाठी नेहमी झटत असतात. त्यामुळे मी असा निर्णय घेतल्याची माहितीही ही बच्चू कडू यांनी दिली. 

Advertisement

Advertisement